स्वच्छता दिवाळी उपक्रमाला अनेक गावांमध्ये फाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 02:20 PM2020-02-24T14:20:05+5:302020-02-24T14:20:12+5:30
पन्नास टक्क्यांपेक्षाही अधिक गावांमध्ये हा उपक्रम साजरा झालाच नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले.
अकोला : स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी १५ ते २३ फेब्रुवारीदरम्यान विविध उपक्रम राबविण्यासोबतच घरोघरी स्वच्छता दिवाळी साजरी करण्याचाही उपक्रम राबविण्याची तयारी जिल्ह्यातील शाळांमध्ये करण्याचे पत्र तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर पन्नास टक्क्यांपेक्षाही अधिक गावांमध्ये हा उपक्रम साजरा झालाच नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. याबाबत पंचायत समिती स्तरावरून माहितीच देण्यात आलेली नाही.
गतवर्षी २३ फेब्रुवारी रोजी अकोला जिल्ह्यातील सर्वच सरकारी, खासगी शाळांमध्ये स्वच्छतेची शपथ घेऊन विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छतेचा संदेश दिला होता. यावर्षीही तोच उपक्रम पुढे सुरू ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले. त्यानुसार १५ ते २३ फेब्रुवारीदरम्यान स्वच्छताविषयक कार्यक्रम आयोजित करणे, त्यादरम्यान जनजागृतीचे उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून पालकांना माहिती दिली जाणार आहे. तसेच त्या दिवशी गावातून प्रभातफेरी काढून त्याद्वारेही जनजागृती होणार आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तसे २२ जानेवारी रोजी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र
पाठविले होते. त्यानुसार प्रत्येक गावातील शाळेत हा उपक्रम साजरा करून घेण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची होती; मात्र त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या उपक्रमाकडेही दुर्लक्ष करण्याचा प्रकार या निमित्ताने उघड झाला आहे.
नियोजनानुसार २३ फेब्रुवारी रोजी ‘स्वच्छता दिवाळी’ हा उपक्रम राबविण्याचे ठरले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून पालकांना माहिती दिली जाणार होती. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी २२ फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांनी आपले घर परिसर स्वच्छ करणे, केरकचºयाची विल्हेवाट लावणे, अंगणात सडा-रांगोळी काढून सजावट करणे, ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवक, ग्रामस्थांनी प्रभातफेरी काढून स्वच्छतेच्या घोषणा देण्याचा कार्यक्रमही ठरला होता. यापैकी एकही कार्यक्रम अनेक ग्रामपंचायतींमध्ये साजरा झाला नसल्याची माहिती आहे.
- अस्वच्छतेच्या जनजागृतीलाही फाटा
सार्वजनिक अन्नदान कार्यक्रमामध्ये होणाºया अस्वच्छतेबाबत जनजागृती करणे, त्यामध्ये अन्नाची नासाडी होते, उरलेले अन्न, उष्ट्या पत्रावळ्या, द्रोण, पाण्याचे ग्लास उघड्यावर फेकले जातात. ते खाल्ल्याने जनावरांना विषबाधा होऊन ते आजारी पडतात. त्यामुळे ग्रामस्थांचे आर्थिक नुकसानही होते. याबाबत जागृती करण्याचाही उद्देश होता; मात्र एकूणच त्या सर्व उपक्रमांना फाटा देण्याचे काम शिक्षण विभागासह जिल्ह्यातील गावांमध्ये झाले आहे.
- पातूर तालुक्यात सर्वच गावे सहभागी
स्वच्छता दिवाळीचा उपक्रम पातूर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायती अंतर्गत ८४ गावांमध्ये राबविण्यात आला. बचत गटांच्या महिलांना उपक्रम यशस्वी केल्याचे विस्तार अधिकारी डॉ. उल्हास मोकळकर यांनी सांगितले.