स्वच्छता अभियानातून सर्वोपचार रुग्णालय चकचकीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:52 PM2020-01-13T13:52:13+5:302020-01-13T13:52:28+5:30
रुग्णालयातील विविध वॉर्डातही स्वच्छता करण्यात आल्याने ऐरवी अस्वच्छ दिसणारे सर्वोपचार रुग्णालय रविवारी चकचकीत दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय परिसरात रविवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या अभियानानंतर सर्वोपचार रुग्णालय परिसरासोबतच वॉर्डदेखील चकचकीत झाले. या मोहिमेत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सर्वोपचार रुग्णालयात रविवारी सकाळी ९.३० वाजता स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी ना. संजय धोत्रे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसद, महापौर अर्चना मसने, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामकुमार शिरसाम, डॉ. दिनेश नैताम, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख, माजी महापौर विजय अग्रवाल, जिल्हा भाजपा अध्यक्ष तेजराव थोरात यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यापूर्वी ना. धोत्रे यांनी उपस्थितांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी आरोग्य विभागातील सर्वच अधिकारी, डॉक्टर व कर्मचाºयांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत रुग्णालय परिसरात स्वच्छतेला सुरुवात केली. बालरुग्ण वॉर्ड परिसर, समता लॉन, जीवनदायी योजना कार्यालय परिसर,अपघात कक्ष परिसरात ही मोहीम राबविण्यात आल्याने रुग्णालयातील दर्शनी भाग स्वच्छ दिसून आला. शिवाय रुग्णालयातील विविध वॉर्डातही स्वच्छता करण्यात आल्याने ऐरवी अस्वच्छ दिसणारे सर्वोपचार रुग्णालय रविवारी चकचकीत दिसून आले. मोहिमेत हरीश आलिमचंदानी, वैशाली शेळके, आशीष पवित्रकर यांच्यासह इतर नगरसेवक ांचाही सहभाग होता.
रुग्ण व रुग्ण नातेवाइकांमध्ये जनजागृतीची गरज
रुग्णालयातील स्वच्छता कायम राखण्यासाठी नियमित स्वच्छतेसोबतच रुग्ण व रुग्ण नातेवाइकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. शिवाय प्रत्येक वॉर्डासह रुग्णलय परिसरात कचरा पेट्यांची गरज आहे. असे झाल्यास रुग्णालयातील स्वच्छता कायम राहण्यास मदत होईल.
महिन्यातून एकदा होईल स्वच्छता अभियान
सर्वोपचार रुग्णालयात रविवारपासून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. स्वच्छतेची ही मोहीम आता प्रत्येक महिन्यातून एकदा राबविण्यात येणार आहे.
स्वच्छता कायम टिकवून ठेवण्याचे आव्हान
मोठ्या उत्साहात सर्वोपचार रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याने रविवारी रुग्णालय परिसर स्वच्छ दिसून आला; मात्र ही स्वच्छता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय प्रशासनासमोर आहे.