‘एमआयडीसी’तील प्रलंबित कामे मार्गी लावा; ‘मिनी फूड पार्क’ साठी पाठपुरावा करा !
By संतोष येलकर | Published: May 13, 2023 06:01 PM2023-05-13T18:01:16+5:302023-05-13T18:01:25+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक
अकोला: महाराष्ट्र आैंद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अकोल्यातील औद्योगिक वसाहतमधील प्रलंबित कामे प्राध्यान्याने मार्गी लावून, जिल्ह्यातील प्रस्तावित ‘ मिनी फूड पार्क’ संदर्भात प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत शुक्रवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला आमदार वसंत खडेलवाल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू. काळे, माविमच्या जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे, महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळचे प्रादेशिक अधिकारी दिगांबर पारधी, एमएसईसीबीचे कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट, जिल्हा नियोजन सहायक अधिकारी कैलाश देशमुख, अकोला इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेष मालू, निरेश बियाणी, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आशिष चंदाणी, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व अकोला उद्योग संघटनेचे सदस्य उपस्थित होते. औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना येणाऱ्या अडचणी तसेच त्यानुषंगाने करावयाच्या उपाययोजना संदर्भात यावेळी आढावा घेण्यात आला.
या बैठकीत जिल्हयात कार्यरत असलेल्या उद्योगांना येणाऱ्या विविध अडचणी उद्योजकांनी मांडल्या. त्यामध्ये ‘ एमआयडीसी ‘मधील रस्ते दुरुस्ती, स्ट्रीट लाईट, पोलिस चौकी, वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा, अतिक्रमणामुळे होणारे अपघात, कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना वैद्यकीय सुविधा यासारख्या समस्या मांडण्यात आल्या. या समस्या संबंधित विभागांनी आपापसात समन्वय साधून सोडवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधित विभागांना दिले. उद्योजकांचे प्रलंबित असलेले प्रस्ताव प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करुन तातडीने मार्गी लावावे,अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
................................
उद्योजकांच्या अडचणी तातडीने
मार्गी लावा : आ.वसंत खंडेलवाल
औद्योगिक वसाहतमधील उद्योजकांना येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावण्याचे सांगत, कामकाजात हयगय करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात यावी आणि वेळप्रसंगी कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार वसंत खंडेलवाल यांनी यावेळी दिले. तसेच जिल्ह्यातील प्रस्तावित मिनी फुड पार्ककरिता प्रशासकीयस्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.