१९ गावांत पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा! जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
By संतोष येलकर | Published: May 10, 2024 09:44 PM2024-05-10T21:44:53+5:302024-05-10T21:47:45+5:30
विंधन विहिरी, कूपनलिकांच्या २० कामांना मंजुरी
संतोष येलकर, अकोला: जिल्ह्यातील पातूर आणि बाळापूर या दोन तालुक्यांतील १९ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी विंधन विहिरी व कूपनलिकांच्या २० कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी ८ मे रोजी दिला. त्यामुळे संबंधित गावांतील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. तापत्या उन्हासोबतच जिल्हयातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी मंजूर कृती आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने पातूर व बाळापूर या दोन तालुक्यातील २० गावांमध्ये २८ लाख ५९ हजार ४८६ रुपये अपेक्षित खर्चाच्या विंधन विहिरी व कूपनलिकांच्या २० कामांना जिल्हाधिकारी कुंभार यांच्या आदेशानुसार प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये बाळापूर पातूर तालुक्यातील १२ गावांत १२ विंधन विहिरी आणि बाळापूर तालुक्यातील ७ गावांत ५ कूपनलिका व ३ विंधन विहिरींच्या कामांचा समावेश आहे.
पातूर व बाळापूर तालुक्यातील ‘या’ १९ गावांत २० कामे मंजूर!
- बाळापूर तालुका : हिंगणा, निंबी, सोनाळा, बहापुरा, वझेगाव या पाच गावांत प्रत्येकी एक कूपनलिका आणि नांदखेड येथे एक व रिधोरा येथे दोन विंधन विहिरींची कामे मंजूर करण्यात आली.
- पातूर तालुका : बोडखा, शिर्ला, विवरा, जांभरुण, भंडारज बु., आलेगाव, माळराजुरा, गाेंधळवाडी, जांब, पाचरण, वनदेव व आसोला या १२ गावांमध्ये १२ विंधन विहिरींची कामे मंजूर करण्यात आली.
कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश!
प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेली पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची संबंधित कामे येत्या ३१ मेपर्यंत किंवा त्यापूर्वी पूर्ण करून, प्रत्यक्ष पाणीपुरवठा करण्यात यावा. ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुंभार यांनी संबंधित यंत्रणांना दिले.