नवीन ७ प्रादेशिक, ३९ स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचा मार्ग मोकळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:18 AM2021-03-14T04:18:26+5:302021-03-14T04:18:26+5:30

अकोला : जलजीवन मिशनअंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात नवीन सात प्रादेशिक पाणीपुरवठा आणि ३९ स्वतंत्र प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या ...

Clear the way for 7 new regional, 39 independent water supply schemes! | नवीन ७ प्रादेशिक, ३९ स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचा मार्ग मोकळा!

नवीन ७ प्रादेशिक, ३९ स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचा मार्ग मोकळा!

Next

अकोला : जलजीवन मिशनअंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात नवीन सात प्रादेशिक पाणीपुरवठा आणि ३९ स्वतंत्र प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील या नवीन पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला.

जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना दरदिवशी दरडोई ५५ लीटर पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील २७३ गावांसाठी नवीन सात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच ५०० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ४३ गावांसाठी ३९ स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील नवीन सात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि ३९ स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची कामे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील या नवीन पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

७५८ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित!

जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात मंजुरी देण्यात आलेल्या नवीन सात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व ३९ स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांच्या कामांसाठी ७५७ कोटी ९८ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामध्ये सात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांसाठी ७४३ कोटी १४ लाख रुपये आणि ३९ स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांच्या कामांसाठी १४ कोटी ८४ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.

नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांमध्ये

अशा आहेत सात योजना!

जिल्ह्यात नवीन सात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये बाळापूर व अकोला तालुक्यांतील ६९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, तेल्हारा तालुक्यात ६९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, बार्शी टाकळी तालुक्यात १३ गावे व १० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, बाळापूर तालुक्यात १३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, अकोट तालुक्यात ६८ गावे व तेल्हारा तालुक्यातील १३ गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि मूर्तिजापूर तालुक्यातील १८ गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा समावेश आहे.

Web Title: Clear the way for 7 new regional, 39 independent water supply schemes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.