आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना कार्यमुक्त, रूजू करण्याचा मार्ग मोकळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 10:28 AM2020-08-28T10:28:43+5:302020-08-28T10:29:06+5:30
आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासह रुजू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आॅनलाइन पद्धतीने २०१७ ते २०२० या कालावधीत चार टप्प्यात आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त आणि रुजू करून घेण्याचे निर्देश शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत २६ आॅगस्ट रोजी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) देण्यात आले. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासह रुजू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत २०१७ ते २०२० या कालावधीत चार टप्प्यात राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया संगणकीय पद्धतीने राबविण्यात आली आहे.
तथापि बिंदुनामावलीचे कारण दाखवून काही जिल्हा परिषदांकडून आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येत नसल्याच्या तसेच काही जिल्हा परिषदांकडून आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना रुजू करून घेण्यात येत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.
त्यानुषंगाने २०१७ ते २०२० या कालावधीत आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करून, संबंधित जिल्हा परिषदांनी आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना रुजू करून घेण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत २६ आॅगस्ट रोजी निर्गमित करण्यात आलेल्या पत्रानुसार राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे राज्यातील विविध जिल्हा परिषदांतर्गत आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा आणि रुजू करण्याचा प्रलंबित असलेला मुद्दा मार्गी लागला आहे.
चार शिक्षकांना रुजू करण्यास दिला होता नकार!
1 शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत २०२० मध्ये अकोला जिल्हा परिषद अंतर्गत २१ शिक्षकांची वेगवेगळ्या जिल्ह्यांत आंतरजिल्हा बदली करण्यात आली असून, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून २८ शिक्षकांची अकोला जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.
2 त्यामध्ये अकोला जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदली झालेल्या एका शिक्षकास जालना जिल्हा परिषदेने आणि तीन शिक्षकांना अमरावती जिल्हा परिषदेने रुजू करुन घेण्यास नकार देत, चारही शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्राद्वारे कळविले होते. त्यामुळे यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शासनाचे मार्गदर्शन मागविले होते.
दहा टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त राहू नये!
जिल्हा परिषदांतर्गत आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करताना आणि रूजू करून घेण्याची कार्यवाही करताना समानीकरणाच्या तत्त्वानुसार शिक्षकांची दहा टक्क्यापेक्षा जास्त पदे रिक्त राहणार नाहीत, यासंदर्भात दक्षता घेण्याच्या सूचनाही ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.