वातावरण बदलाचा हरभरा पिकाला फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 11:01 AM2021-01-06T11:01:19+5:302021-01-06T11:03:53+5:30
Climate change News पावसाचा पिकांवर थेट परिणाम होत नसला, तरी बदललेल्या वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे.
अकोला : वातावरणात अचानक झालेल्या बदलासाेबतच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने विदर्भात हरभरा पिकावर घाटे अळीचे संकट आले आहे. त्यामुळे हरभरा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन फवारणी करण्याचाही सल्ला कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरणानंतर काही दिवस हवामान कोरडे होते. मागील दोन दिवसांत अचानक वातावरणात बदल होऊन अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तज्ज्ञांच्या मते पावसाचा पिकांवर थेट परिणाम होत नसला, तरी बदललेल्या वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. याचा सर्वाधिक फटका पश्चिम विदर्भात बसणार असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांंगितले. यासोबतच तुरीवरही संकट कायम आहे. आगामी एक ते दीड महिना तूर शेतात राहत असेल, तर एक वेळ फवारणी करणे आवश्यक आहे, मात्र तूर हार्वेस्टिंगवर असेल तर फवारणीची गरज नसल्याचेही कृषी तज्ज्ञांनी सांगितले.
फेब्रुवारीपर्यंत अवकाळीची शक्यता
प्रशांत महासागरात २ ते ३ अंशाने तापमान घटल्याने हवेतील दाब वाढत आहे. तेथील बाष्प दक्षिण आशियाकडे लोटले जाते. ऑगस्ट २०२० पासूनच प्रशांत महासागरातील तापमान कमी होत असल्याने दक्षिण आशियात अवकाळी पावसाचे सावट आहे. अवकाळी पावसाचे हे संकट फेब्रुवारीपर्यंत राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले.
अवकाळी पावसापेक्षा वातावरणातील बदलाचा पिकांवर जास्त परिणाम होणार आहे. विदर्भात घाटे अळीचे संकट वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. फरदडीचा कापूस शेतकऱ्यांनी घेऊ नये.
- डॉ. डी. उंदीरवाडे, विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला