पाच वर्षात महापालिकेच्या २४ शाळा बंद; पटसंख्या घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:53 AM2019-02-27T11:53:46+5:302019-02-27T11:53:51+5:30
अकोला: शिकस्त इमारती, स्वच्छतागृहातील अस्वच्छता, मध्यान्ह भोजनाचा उडालेला बोजवारा व अपुऱ्या मैदानांमुळे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या दिवसेंदिवस कमी झाल्याचे चित्र आहे.
- आशिष गावंडे
अकोला: शिकस्त इमारती, स्वच्छतागृहातील अस्वच्छता, मध्यान्ह भोजनाचा उडालेला बोजवारा व अपुऱ्या मैदानांमुळे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या दिवसेंदिवस कमी झाल्याचे चित्र आहे. परिणामी मागील पाच वर्षात महापालिकेच्या २४ शाळा बंद पडल्या असून, यामध्ये सर्वाधिक मराठी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. सद्यस्थितीत केवळ ३३ शाळा सुरू आहेत. शहराच्या कानाकोपऱ्यात खासगी शाळांची संख्या वाढल्याचा परिणाम महापालिकेच्या शाळांवर होत असून, यासंदर्भात मनपा प्रशासनाने तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
मनपा शाळांमध्ये गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. मराठी आणि हिंदी माध्यमातील शाळांमधून विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ही परिस्थिती २० वर्षांपूर्वी नव्हती. कधीकाळी महापालिक ा शाळांमधून दर्जेदार शिक्षण घेऊन सरकारी सेवांमध्ये उच्च पदांवर जाणाऱ्यांची मोठी संख्या होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षक वर्ग अपार मेहनत घेत होते. खासगी शाळांचे पेव फुटले नसल्यामुळे मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम होती. वर्तमान स्थिती लक्षात घेता मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध होत नाहीत. इमारतींची दुरवस्था झाली असून, खेळाचे मैदान, स्वच्छतागृह, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, वर्ग खोल्यांमध्ये लाइट, पंख्यांचा अभाव आहे. या सर्व सुविधा पुरविण्यासाठी तसेच दर्जेदार शिक्षण देण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. तसे होत नसल्यामुळे उर्दू माध्यमाच्या तुलनेत मराठी आणि हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत कमालीची घसरण झाल्याचे चित्र समोर आले आहे.
आता शिक्षकांचीच कसोटी!
मराठी माध्यमाच्या शिक्षकांची उदासीनता, अंतर्गत राजकारणाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या संख्येवर झाल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये ५७ शाळांपैकी तब्बल २४ शाळांचे समायोजन करण्यात आले. आजरोजी ३३ शाळा असून, मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत घसरण होत असल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास मराठी शिक्षकांना अतिरिक्त व्हावे लागेल, असे चिन्ह आहे.
एकूण शाळा आणि पटसंख्या
मराठी माध्यम- १३ शाळा
उर्दू माध्यम -१४ शाळा
हिंदी माध्यम- ६ शाळा
एकूण विद्यार्थी- ७,०१४
मराठी, हिंदी माध्यम पटसंख्या- ३,०७३
उर्दू माध्यम पटसंख्या- ३,९४१