गावातील दारुची अवैध दुकाने बंद करा; धोतर्डीच्या महिलांचा एल्गार
By संतोष येलकर | Published: April 17, 2023 08:34 PM2023-04-17T20:34:28+5:302023-04-17T20:34:38+5:30
उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक कार्यालयात दिली धडक
अकोला: गावातील दारु विक्रीची अवैध दुकाने बंद करण्याच्या मागणीसाठी एल्गार पुकारित अकोला तालुक्यातील धोतर्डी येथील महिलांनी सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक कार्यालयात धडक देत मागणीचे निवेदन दिले. यासोबतच यासंदर्भात बोरगावमंजू पोलीस स्टेशनलाही तक्रार देण्यात आली.
अकोला तालुक्यातील धोतर्डी गावात अवैधरित्या दारु विक्रीची चार पाच दुकाने सुरु असून, दारुच्या व्यसनामुळे गावातील अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होवून काही जणांच्या मृत्यूस दारुचे व्यवसन कारणीभूत ठरले आहे. तसेच दारु पिणाऱ्या व्यक्तींकडून कुटुंबियांना मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या घटनाही होत आहेत. यासोबतच दारुच्या दुकानांमुळे विद्यार्थी व युवकांवरही वाइट परिणाम होत असून, दारुच्या अवैध दुकानांमुळे महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दारु दुकानांच्या परिसरात दारु पिलेल्या पुरुष , युवकांकडून महिला व युवतींना त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यासंदर्भात प्रशासनाने गांभीर्याने विचार करुन, गावातील दारुची अवैध दुकाने तातडीने बंद करुन कायदेशिर करावी, अशी मागणी करित धोतर्डी येथील महिलांनी सोमवार, १७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक कार्यालयात धडक देत मागणीचे निवेदन सादर केले.
तसेच यासंदर्भातील तक्रार बोरगावमंजू पोलीस स्टेशनलाही देण्यात आली. यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष तथा अकोला पंचायत समितीच्या गटनेता मंगला सचिन शिरसाट, वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, मंदा वाकोडे, विकास सदांशिव, धोतर्डीचे सरपंच रामेश्वर गोहाडे, उपसरपंच राजेश गायगोळ यांच्यासह यशोधरा चक्रनारायण, सरुबाइ वानखडे, सुनिता जाधव, लता तायडे, रुपाली दाभाडे, दिपाली दाभाडे, शारदा माेरे, शारदा इंगळे, शालिनी मोरे, मालिनी वानखडे, दुर्गा हनवते, रंजना जाधव, बकुबाइ माेरे, मायावती वाकपांजर, मिना इंगळे, दिपाली ढोके, ज्योती राठोड, उमन लोखंडे, सुनंदा पांडे, वंदना आठवले, सविता हिवराळे, प्रमिला रामचवरे, आशा वानखडे आदी धोतर्डी येथील महिला उपस्थित होत्या.