बंद झालेले वाइन बार पुन्हा सुरू होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:02 AM2017-09-07T01:02:12+5:302017-09-07T01:02:45+5:30
अकोला : राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील वाइन बार, शॉप हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार जिल्हय़ातील २१७ परवाने रद्द करण्यात आले होते; परंतु आता या निर्णयात न्यायालयाने बदल केल्यामुळे बंद झालेले जिल्हय़ातील व मनपा क्षेत्रातील वाइन बार, शॉप, पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे अकोल्यातील लिकर लॉबीमध्ये आनंदाला उधाण आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील वाइन बार, शॉप हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार जिल्हय़ातील २१७ परवाने रद्द करण्यात आले होते; परंतु आता या निर्णयात न्यायालयाने बदल केल्यामुळे बंद झालेले जिल्हय़ातील व मनपा क्षेत्रातील वाइन बार, शॉप, पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे अकोल्यातील लिकर लॉबीमध्ये आनंदाला उधाण आले आहे.
राष्ट्रीय व राज्य मार्गावरील ५00 मीटर क्षेत्रात असलेल्या वाइन बार, वाइन शॉप, बीअर शॉपी हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे १ एप्रिलपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाइन बार, शॉप, देशी दारू दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरणच केले नाही. त्यामुळे जिल्हय़ातील २१७ वाइन बार, शॉप बंद झाले होते. यात शहरातील ११२ वाइन बार व दारूच्या दुकानांचासुद्धा समावेश होता. सद्यस्थितीत जिल्हय़ामध्ये देशी, विदेशी, परमिट रूम, होलसेलर, बीअर शॉपी असे एकूण २५0 दुकाने आहेत. त्यापैकी ८0 टक्के दारूची दुकाने, वाइन बार हे महामार्गावरच आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्हय़ातील अनेक वाइन बार, शॉप, बीअर शॉपी, देशी दारूची दुकाने बंद झाली, तर १९ वाइन शॉप आणि १२ बीअर शॉपला राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५00 मीटर क्षेत्राबाहेर ही दुकाने हलविली होती.
पहिल्या टप्प्यात दीडशे वाइन बार, शॉप सुरू होतील!
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लिकर लॉबीला दिलासा मिळाला असून, जिल्हय़ात पहिल्या टप्प्यात दीडशे वाइन बार, शॉप, बीअर शॉपी सुरू होतील.
३७ देशी दारू दुकानांना प्रतीक्षा
सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात बदल करताना, देशी दारू दुकानांबाबत काही अटी व नियम लागू केले आहे. त्याची तपासणी केल्यानंतर या बंद ३७ दारू दुकानांना परवानगी मिळेल; परंतु तोपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कामगारांमध्ये उत्साह
बार, वाइन शॉप बंद झाल्यामुळे हजारो कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळली होती; परंतु आता पुन्हा किामगारांच्या हातांना पुन्हा काम मिळणार आहे, त्यामुळे बार कामगारांमध्ये उत्साह आहे.
बुधवारी रात्रीपासून जिल्हय़ातील आणि मनपा हद्दीतील जवळपास दीडशे वाइन बार, शॉप, बीअर शॉपी सुरू होतील. उर्वरित बार, शॉप टप्प्याटप्प्याने सुरू होतील. देशी दारू दुकानांसंदर्भात अटी व नियमांची तपासणी केल्यानंतरच ही दुकाने सुरू होतील.
- राजेश कावळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क