खारपाणपट्ट्यात ढगफुटीसदृश पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:24 AM2021-09-08T04:24:42+5:302021-09-08T04:24:42+5:30
अकोट : तालुक्यात सोमवार रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नद्या-नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. खारपाणपट्ट्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शहरातील रस्ते ...
अकोट : तालुक्यात सोमवार रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नद्या-नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. खारपाणपट्ट्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शहरातील रस्ते पाण्याने तुंबले आहेत. तसेच अनेकांच्या घरात पाणी साचले होते. तालुकांतर्गत गावाचा संपर्क तुटला नाही.
अकोट तालुक्यात सायंकाळपर्यंत ५० एमएम सरासरी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील आसेगाव बाजार व वरूर येथे काही घरांमध्ये गावाजवळील नाल्याचे पाणी शिरले होते. त्याबाबत पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. शेतात पाणी साचल्याने पिके वाहून गेली आहेत. शहरातील सखल भागात पाणी साचले असून, वृत्त लिहिण्यापर्यंत पाऊस सुरूच होता. शहरातील कृषी केंद्र दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. अकोट नगरपरिषदेने नाले सफाईकडे दुर्लक्ष केले. खड्डे बुजविले नसल्याने शहरातील रस्त्यावर पाणी भरले, वस्तीत पाणी साचले. पाण्याचा निचरा होत नसल्याने शहरातील रस्त्यावर घाण पसरली असून, रोगराई वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, जोरदार पावसाने पुरामुळे नदीकाठच्या घराचे इतर ठिकाणी नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचा आदेश तहसीलदार नीलेश मडके यांनी सर्व तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांना दिला आहे.