ढगाळ वातावरणाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 11:22 AM2020-02-02T11:22:38+5:302020-02-02T11:22:49+5:30
पिकांना आवश्यक तापमानच मिळत नसल्याने रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांची अनेक भागात वाढ खुंटली आहे.
अकोला : विदर्भात सतत पाऊस व ढगाळ वातावरण राहत असल्याने रब्बी व खरीप पिकांवर प्रतिकूल परिणाम होत असून, गहू, हरभरा पिकांवर किडीसह मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गत वर्षातील पावसाळा नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबला. यावर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाही ढगाळ वातावरण असून, अधून-मधून पाऊस सुरू च आहे. त्यामुळे पिकांना आवश्यक तापमानच मिळत नसल्याने रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांची अनेक भागात वाढ खुंटली आहे. हरभरा पिकांवर मर रोग व घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. विदर्भात यावर्षी हरभरा पिकाची पेरणी डिसेंबर महिन्यापर्यंत तर गव्हाची पेरणी यावर्षी जानेवारी महिन्यापर्यंत करण्यात आली. उशिरा पेरणी केलेल्या हरभºयाची वाढ खुंटली आहे. गतवर्षीचा कापूस यावर्षी जानेवारी महिन्यात बहरला असून, सर्वत्र शेतं पांढरी शुभ्र दिसत आहेत; परंतु ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अगोदरच कापूस पिकावर डिसेंबर महिन्यापासून बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे अनेक भागातील शेतकºयांनी कापसाच्या पिकावर नांगर फिरविला आहे. या सर्व प्रतिकूल नैसर्गिक वातावरणाचा परिणाम पीक उत्पादनावर होण्याची शक्यता तज्ज्ञांकरवी वर्तविण्यात येत आहे. हे वातावरण असेच राहिल्यास हरभºयावरील घाटेअळीचा प्रकोप वाढण्याची शक्यताही तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सध्या काही भागात खरीप हंगामातील तूर काढणीचे काम सुरू आहे, तर काही शेतकºयांनी तूर काढून वाळण्यासाठी शेतात पेंड्या उभ्या केल्या आहेत. तूर वाळल्याशिवाय मळणी करता येत नसल्याने शेतात उभ्या असलेल्या या पिकांनाही पावसाचा धोका निर्माण झाला आहे. ढगाळ वातावरणासोबतच वादळवारा सुटल्यास संत्रा, मोसंबी आणि लिंबू पिकांसह भाजीपाला पिकांचेदेखील नुकसान होण्याची शक्यता आहे.