ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:24 AM2021-09-08T04:24:02+5:302021-09-08T04:24:02+5:30
अकोला : सततचे ढगाळ वातावरण, हवेतील आर्द्रता व प्रदूषण याचा सर्वधिक फटका अस्थमा रुग्णांना बसत आहे. ढगाळ वातावरण अस्थमा ...
अकोला : सततचे ढगाळ वातावरण, हवेतील आर्द्रता व प्रदूषण याचा सर्वधिक फटका अस्थमा रुग्णांना बसत आहे.
ढगाळ वातावरण अस्थमा रुग्णांसाठी धोकादायक ठरत आहे. अशा वातावरणात इतर आजार बळवण्याची शक्यता असल्याने जुन्या अस्थमा रुग्णांना उपचारात खंड पडणे महागात पडू शकते. कोरोनाचा संसर्ग आणि त्यात रोगराईला निमंत्रण देणारे हे वातावरण आहे. अस्थमाचे जे जुने रुग्ण आहेत, त्या रुग्णांना सध्या दम्याचा त्रास वाढत आहे. रुग्णालयात अशा रुग्णांची संख्याही वाढलेली दिसून येते. वयोवृद्ध रुग्णांमध्ये अस्थमा अधिक त्रासदायक असल्याचे सिद्ध झाले आहे. नियमित आहार, व्यायाम व औषधोपचारामुळे अस्थमा रुग्ण निरोगी जीवन जगू शकतात, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
प्रतिकारशक्ती कमकुवत
श्वसनसंस्थेशी निगडित असलेल्या अस्थमा आजारामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अशा रुग्णांना इतर विषाणूंचा धोका असतो. अस्थमा रुग्णांना कोरानाचा फारसा धोका संभवत नसल्याचे अलीकडच्या एका अभ्यासातून समोर आले असले, तरी या रुग्णांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
बालकही अस्थमाचे शिकार
अस्थमामुळे केवळ वयोवृद्धांना नाही, तर युवक व लहान मुलांनाही याचा त्रास होतो. लहान मुलांमध्ये अस्थमाचे प्रमाण फारसे नसले, तरी आनुवंशिकता व ॲलर्जीमुळे काही बालकामंध्ये अस्थमा दिसून येतो.
...ही घ्या काळजी
डाॅक्टरांनी दिलेले नियमित वापराचे औषध कुठल्याही परिस्थितीत बंद करू नका. औषध वेळेवर घेणे हा महत्त्वाचा उपाय आहे.
ॲलर्जीकारक वस्तूंशी संपर्क टाळा. अनेकदा दम्याबरोबर ॲलर्जिक सर्दीसुद्धा सोबत असते. त्यासाठी नाकातील स्टेरॉइड स्प्रे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुरू करा.
ढगाळ वातावरणात जुन्या अस्थमाच्या रुग्णांना त्रास होतो. त्यामुळे अशा रुग्णांनी इन्हेलरचा वापर सुरूच ठेवावा, उपचारामध्ये कोणताही खंड पडू देऊ नये. योग्य औषधोपचार, सकस आहार व व्यायाम ही त्रिसूत्री अशा रुग्णांसाठी निरामय जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे.
-डॉ. समीर लोटे, श्वसनरोगतज्ज्ञ, अकोला