मुलांमधील नार्कोटिक्स कंट्रोलसाठी आता शाळांमध्ये प्रहरी क्लब
By नितिन गव्हाळे | Published: July 2, 2024 09:59 PM2024-07-02T21:59:19+5:302024-07-02T22:02:54+5:30
मादक पदार्थ तस्करीसह आहारी गेलेल्या मुलांना प्रतिबंध करणार
अकोला :शालेय विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्स, मादक पदार्थांचे व्यसन वाढले असून, त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्ज, मादक पदार्थ, तस्करीला प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असून, त्यासाठी शिक्षण आयुक्तांनी शाळांमधील इ. ६ वी ते १२ वीमधील २० ते २५ विद्यार्थ्यांचा समावेश करून प्रहरी क्लब स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या क्लबच्या माध्यमातून मादक पदार्थ तस्करीसह अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलांचे ब्रेन वॉश करून त्यांना प्रतिबंध करण्यात येणार आहे.
शिक्षण विभागाअंतर्गत त्यासाठी केंद्रस्तर ते राज्यस्तर नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहेत. कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रहरी क्लबसोबतच एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईड, इको क्लब, सांस्कृतिक क्लबच्या वतीने मादक पदार्थांचे दुष्परिणामबाबत जागरुकता, वैज्ञानिक माहिती बालकांना माहिती दिल्यास, त्यांना मादक द्रव्य सेवनांच्यापासून परावृत्त करता येऊ शकते. या क्लबमार्फत मादक द्रव्याच्या आहारी गेलेल्या अथवा जाऊ शकतील अशा वातावरणात राहणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवणे व शैक्षणिक संस्थेच्या परिसरामधील होणाऱ्या मादक द्रव्य तस्करीस आळा घालणे आदी कामे होणार आहेत. गांधी स्मृती आणि दर्शन समिती मार्फत या प्रहारी क्लब मधील विद्यार्थी या क्लबमार्फत मादक द्रव्याच्या आहारी गेलेल्या अथवा जाऊ शकतील अशा वातावरणात राहणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवणे व शैक्षणिक संस्थेच्या परिसरामधील होणाऱ्या मादक द्रव्य तस्करीस आळा घालणे या जबाबदाऱ्या पार पाडव्या लागणार आहेत.
असा नियुक्त करावा प्रहरी क्लब
प्रत्येक शाळेतील प्रहारी क्लबमध्ये इ. ६ ते १२ वी वर्गातील एकूण २० ते २५ मुलांचा समावेश करावा. या क्लबमधील सदस्य मादक द्रव्य हाताळणी व सेवन याबाबत संशयित विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवतील आणि याबाबतची गोपनीय माहिती नियुक्त शिक्षकापर्यंत पोहोचवतील.
शालेय मुलांमध्ये व्यसनाधिनता वाढू नये. या दृष्टीकोनातून प्रत्येक शाळेमध्ये प्रहरी क्लब सुरू करण्यात येणार आहे. शाळांनीसुद्धा विद्यार्थ्यांचा समावेश करून प्रहरी क्लब सुरू करून पालकांची बैठक घ्यावी. बैठकीमध्ये तसेच शिक्षक-पालक संघाच्या बैठकीमध्ये चर्चा करुन जागरुकता आणावी.
-डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक