अकोला विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमीन संपादनास मुख्यमंत्र्यांची तत्त्वत: मान्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:46 PM2020-02-08T12:46:49+5:302020-02-08T12:46:55+5:30
विमानतळ विस्तारीकरणाची उपयुक्तता तपासून यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय विमान पत्तन प्राधिकरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
अकोला : अकोल्यातील शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी २२ हेक्टर खासगी जमीन संपादनाच्या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता देत, विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात उपयुक्तता तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय विमान पत्तन प्राधिकरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिले.
अकोल्याचे शिवणी विमानतळ भारतीय विमान पत्तन प्राधिकरणच्या मालकीचे असून, सध्या या विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १ हजार ४०० मीटर व रुंदी ४५ मीटर आहे. या विमानतळावर ‘एटीआर-४२’ प्रकारची विमाने उतरण्याची सोय आहे. तथापि, विमानतळावर ‘एटीआर-७२’ प्रकारची विमाने उतरण्याची सोय उपलब्ध करण्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १ हजार ८०० मीटरपर्यंत वाढविणे प्रस्तावित आहे. त्यानुषंगाने विमानतळ विस्तारीकरणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ६०.६८ हेक्टर जमिनीचा ताबा भारतीय विमान पत्तन प्राधिकरणला देण्यात आला आहे; मात्र २२ हेक्टर खासगी जमीन संपादनाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यानुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार, ७ फेबु्रवारी रोजी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे अकोल्यातील शिवणी विमानतळ विस्तारीकरणाच्या मुद्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून माहिती घेतली. त्यानुसार विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमीन संपादन करण्याच्या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तथापि, विमानतळ विस्तारीकरणाची उपयुक्तता तपासून यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय विमान पत्तन प्राधिकरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
खासगी जमीन संपादनाचा असा आहे प्रस्ताव!
अकोल्यातील शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी २२ हेक्टर खासगी जमीन संपादन करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ८० कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीच शासनाकडे सादर करण्यात आला आहे.