मराठा आरक्षणावर CM शिंदे,जरांगे पाटील ताेडगा काढतील; OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही - बावनकुळे
By आशीष गावंडे | Published: September 13, 2024 10:08 PM2024-09-13T22:08:58+5:302024-09-13T22:09:42+5:30
जिल्ह्यातील विधानसभा मतदासंघनिहाय आढावा घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकाेल्यात दाखल झाले असता, त्यांनी शुक्रवारी पत्रकारांसाेबत संवाद साधला.
अकाेला: मराठा समाजाला आरक्षण देणारच अशी शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली हाेती. मराठा समाजाचे नेते मनाेज जरांगे पाटील सगेसाेयऱ्यांचा अध्यादेश काढण्यासाठी आग्रही आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ही प्रक्रिया पार पडेल. दरम्यान, या संवेदनशिल मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जरांगे पाटील एकत्र बसून ताेडगा काढतील,अशी भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली.
जिल्ह्यातील विधानसभा मतदासंघनिहाय आढावा घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकाेल्यात दाखल झाले असता, त्यांनी शुक्रवारी पत्रकारांसाेबत संवाद साधला. मराठा समाजाला महायुती सरकारच्या कालावधीतच १० टक्के आरक्षण देण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान, येत्या ३० सप्टेंबर पासून जरांगे पाटील आमरण उपाेषणाला बसणार असल्याच्या मुद्यावर त्यांना छेडले असता, ओबीसी आरक्षणाला शुन्य टक्के धक्का लागणार नसल्याचे सांगत त्यांनी आरक्षणाचा चेंडू मुख्यमंत्र्यांकडे टाेलवला. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरुन महायुतीमध्ये याेग्य समन्वय असून भाजपकडून ७५ टक्के जागांचा तिढा साेडविण्यात आला आहे. निवडून येणाऱ्या उमेदवारांनाच तिकीट दिल्या जाइल,असे बावनकुळे यांनी सांगितले. लाेकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यास संविधान बदलल्या जाणार असल्याचा अपप्रचार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. त्यामुळे राज्यात १२ ते १३ जागेवर भाजपचे उमेदवार अतिशय कमी फरकाने पराभूत झाले. दुसरीकडे राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपविण्याची भाषा करीत असल्यामुळे काॅंग्रेसचा आरक्षण विराेधी चेहरा समाेर आल्याची टिका प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली. पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धाेत्रे, आ.वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशाेर मांगटे पाटील,
आरक्षण संपविण्याची भाषा भाजपची नाहीच!
लाेकसभा निवडणुकीत ४०० पार चा नारा दिला हाेता. त्यादरम्यान, पक्षाने कधीही संविधान बदलण्याची किंवा आरक्षण संपविण्याची भाषा केली नाही. काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करुन विराेधकांनी त्याचे भांडवल केल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
शिवरायांचा पुतळा;फडणवीसांची माफी
मालवण येथील राजकाेट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काेसळल्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली नसल्याच्या मुद्यावर बावनकुळे यांना विचारणा केली असता, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मुंबइत जाहीर माफी मागितली. फडणवीस यांनी मिडीयासमाेर भूमिका मांडली नसली तरी त्यांनी साेशल मिडीयाद्वारे माफी मागितल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.