तेल्हारा नाफेड तूर प्रकरण थांबविण्यासाठी सहकार नेते मुंबईत ठाण मांडून
By admin | Published: June 30, 2017 08:25 PM2017-06-30T20:25:15+5:302017-06-30T20:25:15+5:30
तेल्हारा: सहकार मंत्र्यांनी नाफेड तूर खरेदी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर, प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून काही सहकार नेते गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : नाफेडने तूर खरेदी चालू केल्यानंतर बाजार समितीने पुरवणी टोकनाच्या नावावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचे उधडकीस आले. एवढेच नव्हे तर एका प्राध्यापकाने मयत वडिलांच्या नावावर तूर मोजली. या गैरप्रकाराची चौकशी करून त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार मंत्र्यांनी दिल्यानंतर सदर प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून येथील सहकार नेते गेल्या तीन दिवसापासून मुंबईत ठाण मांडून आहेत.
तेल्हारा बाजार समितीने नाफेड तूर खरेदीमध्ये १०० च्या जवळपास पुरवणी टोकन देऊन मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केले. त्यांची तक्रार शेतकऱ्यांनी १६ मे रोजी थेट मुंबई गाठून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी झालेल्या गैरप्रकाराची चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे सदर प्रकरण गैरप्रकारात सहभागी असलेल्यांच्या अंगलट येण्याची शक्यता असल्याने सहकार नेते ही चौकशी थांबविण्यासाठी तीन दिवसापासून मुंबईत ठाण मांडून आहेत. नाफेडच्या तूर खरेदी प्रकरणात एवढ्या मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होऊनही यातील अधिकारी ताठ मानेने फिरत आहेत. सदर प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर दुयम निबंधक कार्यालयाने चौकशी केली असली तरी अजूनपर्यंत काहीच कार्यवाही झाली नाही.