पारस वीजनिर्मिती प्रकल्पात कोल मिलमध्ये पुन्हा आग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:12 AM2021-03-29T04:12:41+5:302021-03-29T04:12:41+5:30
पारस: पारस येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कोल मिलमध्ये आग लागण्याच्या घटना सुरूच असून वीज निर्मिती क्रमांक संच ३ ...
पारस: पारस येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कोल मिलमध्ये आग लागण्याच्या घटना सुरूच असून वीज निर्मिती क्रमांक संच ३ मध्ये शनिवारी रात्री १०.५० वाजता पुन्हा आग लागल्याची घटना घडली. परंतु विज निर्मितीवर कोणताही परिणाम झाला नाही. आगीवर नियंत्रण मिळविताना, एका कर्मचाऱ्याच्या पायाला दुखापत झाली. तब्बल अडीच तासाच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. वीज निर्मिती प्रकल्पामध्ये सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. याला येथील अधिकाऱ्यांची कार्यपद्धती जबाबदार असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. विज निर्मिती कंपनीतीलच कार्यकारी पदाचा कारभार पाहणाऱ्या कार्यकारी अभियंत्याला चक्क अधीक्षक अभियंता पदाचा प्रभार देण्यात आला. यावरून मुख्य अभियंता सदर कार्यकारी अभियंत्यावर मेहरबान असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर आगीची घटना घडलेल्या कोल मिलचा कंत्राटही गेल्या अनेक वर्षांपासून एक्स्ट्रीम इंजीनियरिंग नावाने असलेल्या आसिफ खान व पार्टनर सुबोध देशपांडे यांच्या मालकीच्या कंपनीला दिला जात आहे. या कंपनीच्या र्दुलक्षामुळे येथे नेहमीच आगीच्या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर कंत्राटदाराच्या निकृष्ट कामाच्या दर्जामुळे वीजनिर्मिती कंपनीला लाखो रुपयांचा फटका बसत असून, यामध्ये प्रकल्पाचे अधिकारी आणि कंत्राटदारांचे साटेलोटे आहेत. त्याचबरोबर अधिकारांच्या बेताल कार्यपद्धतीमुळे परिणाम ऊर्जा निर्मितीवर होत आहे. सद्यस्थितीत प्रकल्पातून ५०० मेगावॅटपेक्षाही कमी वीज निर्मिती होत आहे. याकडे महाजनकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन येथील अधिकाऱ्यावर कारवाई करावी. अशी मागणी होत आहे.
आगीच्या भक्ष्यस्थानी कबुतरे
अधिकारी म्हणतात, कोणत्याच प्रकारची जीवितहानी झाली नाही.
पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील संच क्रमांक ४ व ३ मधील कोल मिलला २६ व २७ मार्च रोजी लागलेल्या आगीत शंभरच्यावर कबुतरे आगीत होरपळून मृत्यूमुखी पडली आहेत.
बारा वर्षांपासून कार्यकारी अभियंता एकाच ठिकाणी!
येथे कार्यरत कार्यकारी अभियंत्याने, पारस प्रकल्पात बारा वर्षांचा काळ एकाच ठिकाणी घालवला असूनही आणि सदर अभियंत्याची बदली झाल्यानंतरही हा अभियंता येथेच ठाण मांडून आहे. एवढेच नव्हे तर या अभियंत्याने स्वतःच्या अनेक नातलगांना कंत्राटी कामावर कामगार म्हणून ठेवल्याची माहितीही समोर आली आहे.