कोकेन प्रकरण; तिसर्या आरोपीस तात्पुरता जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:31 AM2017-10-11T01:31:41+5:302017-10-11T01:34:25+5:30
अकोला : कोकेन जप्ती प्रकरणात कोकेनची खरेदीमध्ये सहभागी असलेल्या तिसर्या आरोपीस न्यायालयाने सोमवारी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. रितेश संतानी असे या कोकेन खरेदीदाराचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोकेन जप्ती प्रकरणात कोकेनची खरेदीमध्ये सहभागी असलेल्या तिसर्या आरोपीस न्यायालयाने सोमवारी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. रितेश संतानी असे या कोकेन खरेदीदाराचे नाव आहे.
अकोल्यातील बड्या धनदांडग्यांच्या मुलांसाठी आणण्यात येणारे ४२.१५ ग्रॅम कोकेन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६ ऑक्टोबर रोजी रेल्वे स्टेशन परिसरातून जप्त केले होते. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत १0 लाख रुपये असून, राज्यातील किंमत दोन लाखांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी विजय ऊर्फ बाबू चंदू हिरोळे (१९) याला अटक केली होती. हिरोळे हा मुंबईतील ‘जेम्स’ नामक व्यक्तीकडून कोकेनची खरेदी करीत असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. त्यानंतर यामध्ये अकोल्यातील सिंधी कॅम्पमधील विक्की घनश्यामदास धनवानी आणि रितेश कन्हैयालाल संतानी या दोघांची नावे समोर आली. पोलिसांनी या दोघांच्या अटकेचा प्रयत्न केला; मात्र त्यांना माहिती होताच विक्की धनवानी याने आधीच अटकपूर्व जामीन मिळविला. त्यानंतर सोमवारी रितेश संतानी यालाही न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणात आणखी काही आरोपी असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आणखी पाच आरोपींची नावे पोलिसांनी निश्चित केले असून, त्यांच्यावर लवकरच कारवाईचा फास आवळल्या जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.