अकोल्यात प्रथमच कोकेन जप्त; २ लाख १0 हजार रुपये किंमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:40 AM2017-10-07T02:40:57+5:302017-10-07T02:41:31+5:30
अकोला : मुंबईवरून अवैधरीत्या कोकेन आणून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकास स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी रेल्वे स्टेशन चौकात अटक केली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास केली. पोलिसांनी युवकाकडून ४२ ग्रॅम कोकेन जप्त केली.या प्रकारामुळे अकोल्यात अमली पदार्थ तस्करी होत असल्याचे अधोरखित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मुंबईवरून अवैधरीत्या कोकेन आणून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकास स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी रेल्वे स्टेशन चौकात अटक केली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास केली. पोलिसांनी युवकाकडून ४२ ग्रॅम कोकेन जप्त केली.या प्रकारामुळे अकोल्यात अमली पदार्थ तस्करी होत असल्याचे अधोरखित होते.
स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मुंबईवरून रेल्वेने अकोल्यात कोकेन घेऊन एक युवक येत असल्याची माहिती मिळाली. याआधारे पोलिसांनी रेल्वे स्टेशन चौकात सापळा लावला. कोकेनची पाकिटे घेऊन युवक रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडल्यावर पोलिसांनी त्याला स्टेशन चौकात पकडले. त्याला ताब्यात घेऊन गुन्हे शाखा कार्यालयात आणल्यावर, त्याच्याकडील ४२ ग्रॅमच्या अमली पदार्थ कोकेनचे पाकिट जप्त केले. त्याची चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव विजय ऊर्फ बाबू चंदू हिरोळे (१९) असल्याचे सांगितले. विजय हिरोळे हा गुलजारपुर्यातील रमाबाई आंबेडकर नगरात राहणारा आहे. अनेक महिन्यांपासून तो कोकेनची तस्करी करीत असल्याची माहिती आहे. आतापर्यंत गांजा, चरसची अकोला शहरात तस्करी होत होती. त्याविरुद्ध पोलिसांनी कारवाईसुद्धा केली; परंतु कोकेनसारख्या अमली पदार्थ अकोल्यात पोलिसांनी प्रथमच जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कोकेनची किंमत २ लाख १0 हजार रुपये आहे. पोलिसांनी आरोपीकडून एमएच ३0 एडी ४९९९ क्रमांकाची दुचाकी जप्त केली. या दुचाकीची किंमत ७४ हजार रुपये आहे. आरोपी विजय हिरोळे याने मुंबईवरून कोकेन कोणाकडून घेतली. याचा शोधही पोलीस घेणार आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे, एपीआय चव्हाण, पोलीस निरीक्षक रणजित ठाकूर, राजेश वानखडे, मनोज नागमते, शक्ती कांबळे, अमित दुबे यांच्या पथकाने केली.दरम्यान, आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
-