सर्दी, खोकला म्हणजे ‘कोरोना’ नव्हे: भीती बाळगू नका; सकारात्मक जगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 10:47 AM2020-04-05T10:47:18+5:302020-04-05T10:47:24+5:30
तुम्ही भीती बाळगू नका, सकारात्मक जगा, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत.
अकोला : सध्या सर्वत्र कोरोनाची चर्चा असून, अनेकांमध्ये नकारात्मक विचार वाढल्याचे चित्र आहे. साधा सर्दी, खोकला झाला तरी आपल्याला कोरोना तर नाही ना, अशी शंका अनेकांच्या मनात घर करून बसते. यातील बहुतांश लोक मानसिक आजारानेच पीडित होतात; पण साधा सर्दी, खोकला म्हणजे ‘कोरोना’ नाही. त्यामुळे तुम्ही भीती बाळगू नका, सकारात्मक जगा, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत. मानवी स्वभावानुसार, प्रत्येक जण शंभर चांगल्या गोष्टींपेक्षा एका नकारात्मक गोष्टीला जास्त प्राधान्य देतो. ही स्थिती कोरोनाच्या पृष्ठभूमीवर नागरिकांमध्ये प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे. अनेकांना साधी सर्दी, खोकला किंवा डोकेदुखीदेखील झाली तरी त्यांच्या मनात आपल्यालाही कोरोनाची लागण तर झाली नाही ना, हा विचार घर करून बसतो. त्यामुळे त्यांची चिंता आणखी वाढते अन् ते मानसिक आजारी पडू लागतात. असे काही रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दररोज येत असल्याने डॉक्टरांचीही डोकेदुखी वाढली आहे. हा प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी नकारात्मक गोष्टींचा विचार न करता चांगल्या गोष्टींचा विचार करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, चिंता करण्यापेक्षा रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर नागरिकांनी भर द्यावा, ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली आहे, त्यांच्यावर कोरोनाचा जास्त प्रभाव पडलेला दिसत नाही. त्यामुळे सकारात्मक विचार करा आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
हे करा...
वर्तमानात जगा, भविष्याची चिंता करू नका, सकारात्मक दृष्टिकोन बाळगा, स्वत:ला व्यस्त ठेवा, नियमित व्यायाम करा, योगा, प्राणायम करा, वाचन करा.
व्यस्त ठेवण्यासाठी काय करावे?
कुटुंबासोबत वेळ घालवा, लहान मुलांसोबत वेळ घालवा, शक्य असलेले वैज्ञानिक प्रयोग लहान मुलांसोबत करून पाहा, मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्याचा प्रयत्न करा.
योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास कोरोना होणार नाही. त्यामुळे एकदम घाबरून जाऊ नका. नकारात्मक गोष्टींपेक्षा सकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष केंद्रित करा. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करा, बेचैनी ही नकारात्मक विचारांमुळेच होते. त्यामुळे स्वत:ला व्यस्त ठेवा, सकारात्मक विचार करा.
- डॉ. अनुप राठी, मानवशास्त्र तज्ज्ञ, अकोला.