थंडी वाढणार; आठवड्यात करावा लागणार गार वाऱ्यांचा सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 01:39 PM2020-01-11T13:39:54+5:302020-01-11T13:40:00+5:30
सध्या उत्तरेकडून थंड हवेचे वारे वाहत असल्याने विदर्भात थंडी वाढली असून, हे वातावरण आठवडाभर राहण्याची शक्यता आहे
अकोला : उत्तरेकडील गार वारे राज्याच्या दिशेकडे वाहत असल्याने विदर्भात थंडी वाढली असून, किमान सरासरी तापमान घटले आहे. हे थंड वारे आठवडाभर राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर नैसर्गिक थंडी वाढणार असल्याचा अंदाज कृषी हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. दरम्यान,१० जानेवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.२ अंश नोंदविण्यात आले.
गत चोवीस तासांत शुक्रवार, १० जानेवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर उर्वरित भागात किंचित घट झाली. शुक्रवारी दिवसभर गार वारे वाहत होते. त्यामुळे अकोल्याचे किमान तापमान घटून १०.७ अंशावर आले. बुलडाणा १०.२, वाशिम १०.२, अमरावती १०.०, यवतमाळ ११.०, वर्धा १०.४, नागपूर १०.१ तर चंद्रपूरचे किमान तापमान १२.५ अंश होते.
सध्या उत्तरेकडून थंड हवेचे वारे वाहत असल्याने विदर्भात थंडी वाढली असून, हे वातावरण आठवडाभर राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर नैसर्गिक थंडी वाढणार असल्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. आर. एन. साबळे यांनी वर्तविली आहे.