थंडीमुळे वाढला ‘फंगल इन्फेक्शन’चा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 02:34 PM2019-12-10T14:34:01+5:302019-12-10T14:34:12+5:30
गत काही दिवसांपासून शासकीय रुग्णालयांसह खासगी दवाखान्यांमध्ये त्वचा विकार विशेषत: फंगल इन्फेक्शनच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वाढत्या थंडीमुळे ड्राय स्किनची समस्या वाढू लागली आहे. ड्राय स्किनमुळे त्वचेला खाज सुटत असून, अनेकांना ‘फंगल इन्फेक्शन’ची समस्यादेखील जाणवू लागली आहे. यावर नियंत्रणासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्वचेच्या विविध समस्या डोके वर काढत आहेत. त्वचा कोरडी झाल्याने अंगाला खाज सुटण्याचे प्रमाण वाढले असून, यातील बहुतांश समस्या या फंगल इन्फेक्शनच्या असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हिवाळ्यात प्रामुख्याने गरम वस्त्र परिधान केले जातात. शिवाय, थंडीमुळे अनेक जण आंघोळदेखील टाळतात. परिणामी, त्वचेमध्ये घाम मुरल्याने खाजेची समस्या उद््भवते. गत काही दिवसांपासून शासकीय रुग्णालयांसह खासगी दवाखान्यांमध्ये त्वचा विकार विशेषत: फंगल इन्फेक्शनच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
फंगल इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
हिवाळ्याच्या दिवसांत त्वचेला खाज सुटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनदेखील डॉक्टरांनी केले आहे.
डॉक्टरांसाठीच ठरत आहे डोकेदुखी
फंगल इन्फेक्शनच्या रुग्णांत वाढ होत असून, औषधोपचाराने काही काळासाठी रुग्णांना आराम पडत आहे; मात्र रुग्णांवर करण्यात येणाऱ्या औषधोपचारातून विषाणू नष्ट होत नसल्याने काही दिवसांतच पुन्हा फंगल इन्फेक्शन वाढत असल्याने रुग्ण त्रस्त झाले आहेत. औषध लागत नसल्याने डॉक्टरांसाठीही डोकेदुखी ठरत आहे.
फंगल इन्फेक्शनचे प्रमाण वाढत आहे. जिन्ससारख्या अंगाला चिटकणारे वस्त्र परिधान करणे टाळावे, थंडी असली तरी नियमित आंघोळ करून शरीर स्वच्छ ठेवावे, फंगल इन्फेक्शनची समस्या जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार घ्यावा.
- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, वैद्यकीय अधिकारी, जीएमसी.