जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त प्रतिबंधित क्षेत्रात; नागरिकांची ये-जा सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:21 AM2020-05-12T10:21:00+5:302020-05-12T10:21:21+5:30
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी संयुक्तरीत्या बैदपुरा व खैर मोहम्मद प्लॉट येथील ‘कंटेनमेंट एरिया’ची पाहणी केली
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी संयुक्तरीत्या बैदपुरा व खैर मोहम्मद प्लॉट येथील ‘कंटेनमेंट एरिया’ची पाहणी केली असता त्यांना या भागातून पोलिसांच्या डोळ्यादेखत नागरिकांची ये-जा सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी कर्तव्यावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी तंबी दिली असून, प्रतिबंधित क्षेत्रातील कोणत्याही नागरिकांना या क्षेत्राबाहेर निघण्यास सक्त मनाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
प्रतिबंधित क्षेत्रात मागील काही दिवसांपासून पोलिसांची नाकाबंदी असतानासुद्धा या भागातील नागरिक विविध कामकाजाच्या निमित्ताने प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या बाहेर निघत असल्याचे दिसून आले आहे. ही धक्कादायक बाब पाहता मनपा प्रशासनाने लागू केलेले आदेश व नाकाबंदी केलेल्या पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. या पाहणीदरम्यान मनपाचे नगर सचिव तथा अतिक्रमण विभाग प्रमुख तथा प्रभारी क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते, स्वच्छता व आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर व आरोग्य निरीक्षकांची उपस्थिती होती.
नागरिकांना विचारले घराबाहेर निघण्याचे कारण!
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी बैदपुरा व खैर मोहम्मद प्लॉट भागाची पाहणी केली असता परिसरात नागरिकांची चांगलीच वर्दळ सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी घराबाहेर फिरणाºया नागरिकांना जिल्हाधिकारी यांनी घराबाहेर निघण्याचे कारण विचारले असता नागरिक उत्तर देऊ शकले नाहीत.