जिल्हाधिकारी पोहोचले शेतीच्या बांधावर; पीक परिस्थितीची केली पाहणी!
By संतोष येलकर | Published: October 14, 2023 06:05 PM2023-10-14T18:05:08+5:302023-10-14T18:05:40+5:30
‘यलो मोझॅक’मुळे सोयाबीन नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश
अकोला : जिल्हाधिकारी अजित कुंभार शनिवारी चार गावांना भेटी देत शेतीच्या बांधावर पोहोचले. पीक परिस्थितीची पाहणी करुन ‘यलो मोझॅक’मुळे सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे पंचनामे आणि विमा संरक्षित क्षेत्रातील नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला दिले.
जिल्हयातील कळंबेश्वर, गोरेगाव, माझोड या गावांत भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पीक परिस्थितीची पाहणी केली. त्यामध्ये ‘यलो मोझॅक’मुळे सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान तसेच सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांवर उदभवलेल्या विविध कीड व रोगाची माहिती घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, तालुका कृषी अधिकारी शशिकीरण जांभरूणकर, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप राऊत आदी उपस्थित होते.
वनराइ बंधाऱ्याच्या कामालाही दिली भेट!
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी चिखलगाव येथे भेट देवून लोकसहभागातून सुरु असलेल्या वनराई बंधाऱ्याच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.