जिल्हाधिकारी, एसएओ शेताच्या बांधावर; पीक नुकसानाची केली पाहणी
By रवी दामोदर | Published: February 27, 2024 05:33 PM2024-02-27T17:33:29+5:302024-02-27T17:34:01+5:30
वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात सोमवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे सोंगणीला आलेला गहू, हरभरा व लिंबूसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अकोला : जिल्ह्यात सोमवारी अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला असून, प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती आहे. दरम्यान मंगळवारी जिल्हाधिकारी अजीत कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत नुकसानाची पाहणी केली. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्ह्यात गत २४ तासांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात सोमवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे सोंगणीला आलेला गहू, हरभरा व लिंबूसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुरुवातील खरीप हंगामात झालेले नुकसान व आता ऐन सोंगणीवेळी बसलेल्या अवकाळीच्या तडाख्याने शेतकरी हवालदील झाला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अजीत कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी अकोला तालुक्यातील वल्लभनगर, निंभोरा, कासली परिसरात थेट शेताच्या बांधावर जात नुकसानाची पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे सांगितले. याप्रसंगी कृषी, महसुल विभागाचे कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.
जिल्ह्यात दि. २६ फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली असून, संबंधित कर्मचाऱ्यांना नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच पीक विमाधारक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेअंतर्गत पूर्वसूचना नोंद करावी.
- शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.