सरकारच बदलल्याने महाविद्यालयीन निवडणुका अधांतरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 12:34 PM2019-12-06T12:34:58+5:302019-12-06T12:35:06+5:30
विधानसभा निवडणुकीमुळे महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलल्या; परंतु आता भाजप सरकार बदलून, महाविकास आघाडीचे सरकार आले आहे.
अकोला : देशातील इतर राज्यांत ज्या पद्धतीने खुल्या निवडणुका होतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात शासनाने तब्बल २९ वर्षांनंतर महाविद्यालयीन निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. विद्यापीठांना नियमावली जाहीर करून अधिसूचनासुद्धा काढल्या होत्या; परंतु विधानसभा निवडणुकीमुळे महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलल्या; परंतु आता भाजप सरकार बदलून, महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे महाविद्यालयीन निवडणुका रद्द होणार असल्याची चर्चा विद्यार्थी संघटनांमध्ये सुरू झाली आहे. निवडणुकीसंदर्भात विद्यापीठ प्रशासनाला कोणत्याही सूचना नाहीत.
तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सर्व विद्यार्थी संघटनांची बैठक घेऊन महाविद्यालयात खुल्या पद्धतीने निवडणुका घेण्याबाबत चर्चा केली होती. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी आनंद व्यक्त केला. एवढेच नाही तर निवडणुका घेण्याचे शासनाने घोषितसुद्धा केले होते. त्यानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघ खुल्या निवडणुकीचा कार्यक्रम विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे जाहीरसुद्धा करण्यात आला होता. ४ सप्टेंबरला मतदानसुद्धा होणार होते; परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्यात आल्यामुळे महाविद्यालयीन निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन झाले असते तर महाविद्यालयीन निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असता; परंतु आता राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता महाविद्यालयीन निवडणुका होतील की नाही, याविषयी अस्पष्टता आहे. महाविद्यालयीन निवडणुकांविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष उदासीन असल्यामुळे निवडणुकांचा कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही युवा नेतृत्वाला संधी मिळणार की नाही, असा प्रश्न विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे.
निवडणुका घेण्यास भाग पाडू!
खुल्या पद्धतीने महाविद्यालयीन निवडणुकांचा विद्यापीठाने कार्यक्रम जाहीर केला होता; परंतु आता सरकार बदलले आहे. नव्या सरकारला महाविद्यालयीन निवडणुका घेण्यासाठी भाग पाडू, अशी भूमिका काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटना एनएसयूआयचे प्रदेश महासचिव आकाश कवडे, अभाविपचे जिल्हा संयोजक मनीष फाटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महानगराध्यक्ष शैलेश बोदडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नितेश किर्तक, पवन गवई यांनी घेतली आहे. अनेक वर्षांपासून युवा नेतृत्व समोर आले नाही. युवकांनी संधी मिळत नाही. महाविद्यालय निवडणुका घेतल्या तर युवकांनी नेतृत्वाची संधी मिळेल, अशी अपेक्षाही विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केली आहे.