कोविड लसीकरणाची जिल्ह्यात आज रंगीत तालीम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:58 AM2021-01-08T04:58:40+5:302021-01-08T04:58:40+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून, मृत्यूचा आकडाही चिंताजनक आहे. यावर नियंत्रणासाठी प्रशासन आवश्यक सर्वच प्रयत्न करत आहे. दरम्यान, गत ...
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून, मृत्यूचा आकडाही चिंताजनक आहे. यावर नियंत्रणासाठी प्रशासन आवश्यक सर्वच प्रयत्न करत आहे. दरम्यान, गत महिन्यापासून राज्यभरात जिल्हा स्तरावर लसीकरण मोहिमेची तयारीही केली जात आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभीच देशात दोन लसींना मान्यता मिळाली. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरण मोहिमेच्या तयारीला गती आली आहे. कोविड लसीकरणासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या अंतर्गत शुक्रवारी जिल्ह्यात कोविड लसीकरणाची रंगीत तालीम केली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील चार केंद्रांची निवड करण्यात आली असून, यामध्ये दोन केंद्र अकोला शहरातील आहेत. या चारही केंद्रांवर शुक्रवारी सकाळी ९ वाजता एकाच वेळी लसीकरणाची रंगीत तालीम केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
या केंद्रांची निवड
कान्हेरी सरप प्राथमिक आरोग्य केंद्र
बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालय
जिल्हा स्त्री रुग्णालय,अकोला
अशोक नगर आरोग्य केंद्र, मनपा
अशी होणार रंगीत तालीम
प्रत्येक केंद्रावर २५ लाभार्थ्यांचे डमी लसीकरण.
नोंदणीनुसार लाभार्थ्यांचे लसीकरण होते किंवा नाही, याचे निरीक्षण.
लसीकरणानंतर लाभार्थी ३० मिनीटांसाठी राहील डॉक्टरांच्या निरीक्षणात.
त्यानंतर लाभार्थ्याला सुटी दिली जाईल.
प्रत्येक केंद्रावर पाच अधिकारी
निवड केलेल्या चारही केंद्रांवर प्रत्येकी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. यासंदर्भात अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
कोविड लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून शुक्रवारी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात येणार आहे. आयुक्तांच्या सूचनेनुसार ही रंगीत तालीम केली जाणार आहे. यानुसारच आगामी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.
काल आरोग्य आयुक्तांची व्हीसी झाली होती. त्यामध्ये त्यांनी सर्वांना आवश्यक सूचना दिल्या.