मोर्णेच्या स्वच्छतेसाठी नदीकाठी एकत्र या - जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:36 AM2018-01-11T01:36:00+5:302018-01-11T01:36:48+5:30
शहराला लाभलेल्या या विशाल नदीला अस्वच्छतेतून बाहेर काढण्यासाठी व तिला पवित्र बनविण्यासाठी शनिवार, १३ जानेवारीला आपण सर्व मिळून नदीची स्वच्छता करू या, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोल्यातून वाहणारी आपली मोर्णा नदी ही शहराचे वैभव आहे. आज ही नदी जलकुंभी व कचर्यामुळे अस्वच्छ झाली आहे. यामुळे या नदीचा श्वास गुदमरुन गेला आहे. परिणामी, नदीच्या परिसरातील वातावरण दूषित झाले आहे. शहराला लाभलेल्या या विशाल नदीला अस्वच्छतेतून बाहेर काढण्यासाठी व तिला पवित्र बनविण्यासाठी शनिवार, १३ जानेवारीला आपण सर्व मिळून नदीची स्वच्छता करू या, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.
१३ जानेवारी २0१८ रोजी ठीक सकाळी ८ वाजता लोकसहभागातून मोर्णा नदीच्या महास्वच्छतेच्या कार्यास प्रारंभ होणार आहे, जिल्हाधिकारी म्हणाले की, शनिवारी, प्रत्यक्ष हजारो नागरिकांच्या मदतीने मोर्णा स्वच्छ केली जाईल. एखाद्या नदीच्या स्वच्छतेसाठी हजारो लोक एकत्र येणारी ही कदाचित देशातील पहिलीच घटना ठरेल. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी माझे सर्व अकोलेकरांनी १३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मोर्णा नदीच्या तटावर निश्चितपणे यावे.
मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी झाली आहे. स्वच्छतेसाठी नदी किनारी १४ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी स्वच्छता पथकांची स्थापना करण्यात आली आहे. सर्पमित्र पथक, वैद्यकीय सहायता पथक, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथक नदीकाठी हजर राहणार आहे.