‘चला बोलू या...स्किझोफ्रेनिया रुग्णांना भावनिक आधार देऊ या’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:14 PM2018-05-24T13:14:59+5:302018-05-24T13:14:59+5:30
अकोला : मनुष्याला केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आजारही जडतात. या मानसिक आजारांमध्ये स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर आजार असून, या आजारामध्ये रुग्णांची मन:स्थिती ही दुभंगलेली असते.
अकोला : मनुष्याला केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आजारही जडतात. या मानसिक आजारांमध्ये स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर आजार असून, या आजारामध्ये रुग्णांची मन:स्थिती ही दुभंगलेली असते. असा आजार जडलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष न करता त्यांना भावनिक आधार गरजेचा असतो. औषधोपचार व समुपदेशन यांची योग्य सांगड घातल्यास या आजारातून स्किझोफ्रेनिया रुग्ण मुक्त होऊ शकतो.
प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. एगन ब्ल्यूर यांनी २४ मे २००८ रोजी बर्लिन येथे स्किझोफ्रेनिया या विषयावर सर्वप्रथम माहिती सादर केली. तेव्हापासून दरवर्षी २४ मे रोजी जागतिक स्क्रिझोफेनिया हा दिन साजरा केला जातो. या आजारात रुग्णांची मन:स्थिती ही दुभंगलेली असते. थोडक्यात रुग्णांच्या विचार व वर्तनात मोठी तफावत असते. रुग्ण हा आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर एक वेगळे विश्व तयार करतो व त्यामध्ये तो रममान होऊन जगण्याचा प्रयत्न करतो. कोणीतरी माझ्या विरोधात आहे, कोणीतरी माझ्याविरुद्ध कट-कारस्थान रचतोय, अशा प्रकारचे भास व भ्रम रुग्णाला होतात. सतत एकांतात बसून पुटपुटणे, हातवारे करणे, कुटुंबातील व्यक्तींवर संशय घेणे, शिवीगाळ करणे, महिनोमहिने आंघोळ न करणे असे वर्तन या आजारात दिसून येते.
१३ टक्के लोक मानसिक आजाराने ग्रस्त
‘एनआयएमएचएएनएस’ने केलेल्या संशोधनानुसार १३.७ टक्के लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. यामध्ये स्किझोफ्रेनिया व निराशेचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. १८ ते २५ या वयोगटातील व्यक्तींना हा आजार जडण्याची शक्यता जास्त असते.
स्किझोफ्रेनियाची कारणे
मानसिक ताणतणाव.
जवळच्या व्यक्तीचे निधन.
अमली पदार्थांचे अतिसेवन.
काही प्रमाणात आनुवंशिकता.
लक्षणे
भ्रम व भास होणे.
स्वत:शी पुटपुटणे.
संशयी वृत्ती वाढणे.
झोप न लागणे.
विनाकारण चिडचिडेपणा येणे.
विचित्र हातवारे करणे.
उपचार महत्त्वाचा
योग्य निदान व उपचारामुळे स्क्रिझोफनिक रुग्ण सर्वसामान्यांसारखे जीवन जगू शकतात. आधुनिक औषधोपचाराने ३० ते ४० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात, तर ३० ते ४० टक्के रुग्णांमध्ये मधून-मधून लक्षणे दिसतात. उर्वरित २० टक्के रुग्ण प्रतिसाद देत नाहीत. यामध्ये औषधोपचारांसोबतच समुपदेशनही महत्त्वाचे आहे. काही रुग्णांना ‘ई.सी.टी.’ (शॉक) हा उपचारही द्यावा लागतो. शिवाय, कुटुंबाचे सहकार्यही महत्त्वाचे आहे.
स्क्रिझोफेनिया झालेल्या रुग्णांकडे अजिबात दुर्लक्ष न करता त्यांना भावनिक आधार देणे महत्त्वाचे असते. योग्य उपचार व समुपदेशन केल्यास हे रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात.
- अशोक जाधव, समुपदेशन सामाजिक कार्यकर्ता, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, अकोला.