पाणी विक्रीच्या दुकानांना ऊत!
By admin | Published: April 10, 2017 01:10 AM2017-04-10T01:10:14+5:302017-04-10T01:10:14+5:30
पाण्याचा धर्म हरविला: कॅनमधले पाणी विकून पैसा कमाविण्याचा व्यवसाय तेजीत
अकोला: एकेकाळी पाणी पाजणे हा धर्म समजला जात होता. ठिकठिकाणी धर्मार्थ पाणपोई लागायच्या आणि वाटसरूंना प्यायला पाणी उपलब्ध व्हायचे; परंतु हळूहळू पाण्याचा धर्म हरवला आणि पाण्याचे व्यावसायीकरण सुरू झाले. आता तर जागोजागी पाणी विक्रीची दुकाने मांडल्या गेली. पाणी सीलबंद पद्धतीने न विकता कॅनमधून विकण्याचा धंदाच जिल्हाभरात सुरू झाला आहे. २५ ते ३० रुपयांत मिळणाऱ्या कॅनमधील पाण्याचे ८० ते १०० रुपये कमाई केल्या जात आहे. यातून आरोग्याचा प्रश्न उभा राहिला तर जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काही वर्षांपूर्वी वाटसरूंची तहान भागविण्यासाठी शहरासह गावांमधील प्रत्येक रस्त्यावर पाणपोई लावली जायची. तहान भागविणे हा धर्म समजला जायचा; परंतु हा धर्म आता लोप पावला आहे. पुण्याच्या कामाला व्यावसायिक स्वरूप देऊन पैसा कमाविण्याचा पाणी हा धंदा झाला आहे. कॅनमधील थंड पाणी पाच रुपये लीटर दराने विकल्या जात आहे. सीलबंद पद्धतीने पाणी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना अन्न व औषध प्रशासनाचा परवाना घ्यावा लागतो; परंतु कॅनमधील पाणी विकण्यासाठी अन्न व औषधी प्रशासनाचा परवाना लागत नसल्यामुळे जिल्हाभरात पाणी विक्रेत्यांनी सर्रास पाणी विक्रीची दुकाने थाटली आहेत. पाणी शुद्धतेच्या ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता केल्याशिवाय व्यावसायिका पाणी फिल्टर करून ते पॅकबंद करण्याचा प्लांट सुरू करता नाही; परंतु शेकडो प्लांट अनधिकृतपणे पाणी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. प्रत्यक्षात शहरात परवाना नसतानाही खुलेआम पाणी विक्री केली जाते. हे विक्रेते पाणी सीलबंद न करता बंद कॅनमधून पाणी विकत असल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण, निर्बंध नाहीत. खुल्या पद्धतीने पाण्याची विक्री करणारे व्यावसायिक शासनाचा शॉप अॅक्ट परवाना आणि जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतून पाणी पिण्यासाठी योग्य आहे. याचे प्रमाणपत्र घेऊन सर्रास व्यवसाय करीत आहेत. काही अधिकारी आर्थिक तडजोडी करून पाण्याचे नमुने तपासण्याचा बनाव करून प्रमाणपत्र उपलब्ध करून देतात; मात्र तपासणीसाठी आलेले पाणी कोणत्या ठिकाणचे आहे, हेसुद्धा अधिकाऱ्यांकडून पाहिले जात नाही. भेसळप्रकरणी शासनाचा अन्न व औषध प्रशासन सतर्क असताना, पाण्याच्या बाबतीत, पाण्याच्या विक्रीबाबतीत का दुर्लक्ष केल्या जाते, असा प्रश्न उपस्थित होतो.
कॅनमधील पाणी पिण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर जबाबदार कोण, असे प्रश्न या व्यवसायामुळे उपस्थित होत आहेत.
३० रुपयांच्या कॅनचे होतात ८० रुपर्ये$िंशहरातील व शहराबाहेर जाणाऱ्या अनेक मार्गांवर कॅनमधील पाणी विक्रीसाठी ठेवलेले अनेक ठिकाणी दिसून येते. या ठिकाणी पाण्याच्या रिकाम्या बाटल्यासुद्धा ठेवल्या जातात. तहानलेल्या व्यक्तीकडून विक्रेता एक लीटर पाण्याचे पाच रुपये वसूल करतो. कॅनमधील १५ लीटर पाण्याची किंमत २५ ते ३० रुपये आहे. विक्रेता या कॅनवर ८० ते ८५ रुपये कमाई करतो. दिवसाला ३०० रुपयांच्या दहा कॅन पाणी घेतले, तर विक्रेता या कॅनमधील पाण्याच्या विक्रीतून ८०० ते ९०० रुपये कमावतो. कॅनमधील पाण्यातून विक्रेत्याला चौपट पैसा मिळतो; परंतु पाणी कितपत शुद्ध असेल, याची नो गॅरंटी.
बाटलीबंद पाण्याची प्रक्रिया...
विविध नावाने पाण्याची बाजारात विक्री होते. बाटलीबंद पाण्याची किंमतही वेगवेगळी असते. या पाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया, त्याची कार्यपद्धती ब्युरो आॅफ इंडिया स्टँडर्सने ठरवून दिली आहे. पाणी विहीर, बोअरिंगमधून उपसल्यानंतर सर्वप्रथम गाळले जाते. त्यासाठी वाळूच्या व कार्बनच्या गाळ्यांचा वापर केला जातो. त्यानंतर पाण्याच्या शुद्धीकरणाची व निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करण्यात येते. यासोबतच ओझोनेशनची प्रक्रियाही होते. या प्रक्रियेनंतर निर्जंतुक अशा बाटल्या व पाऊचमध्ये पाणी बंद केले जाते.
जिल्ह्यात ७६ पेक्षा अधिक प्लांट
शहरात व जिल्ह्यात खुल्या पद्धतीने पाण्याची विक्री करणारे ७६ पेक्षा अधिक व्यावसायिक आहेत. या सर्व व्यावसायिकांनी आरोग्य प्रयोगशाळेतून पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे; मात्र यापैकी अनेक व्यावसायिकांकडे प्रमाणपत्रच नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह अन्न व औषध प्रशासनाने या प्लांटची तपासणी करण्याची गरज आहे.
विनापरवाना कॅनमधील पाण्याची सर्रास विक्री
कॅनमधील पाण्याची विक्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचा परवाना लागत नाही. त्यामुळेच जिल्हाभरामध्ये पाणी विक्रीला प्रचंड ऊत आला आहे. शहर व जिल्ह्यातील अनेक मार्गांवर पाणी विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. शुद्ध आणि थंड पाण्याच्या नावाखाली ग्राहकांची सर्रास लुबाडणूक केल्या जात आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतून पाण्याची तपासणी न करताच विक्री होत आहे. आरोग्य विभागाचे अधिकारीसुद्धा याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात.
पाण्याचे आकडे काय सांगतात
२.२० लाख लीटर पाण्याची १२ हजार कॅनमधून विक्री.
२५ ते ४० रुपये एक कॅनची किंमत.
६ लाख ८० हजार रुपयांची दररोज ४० प्रतिष्ठानांच्या माध्यमातून शहरात कॅनची विक्री