मंगळवारी धुमकेतू पृथ्वीच्या जवळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 10:49 AM2020-07-19T10:49:42+5:302020-07-19T10:50:25+5:30
उत्तर-पश्चिम क्षितिजावर सायंकाळी सूर्यास्तानंतर नुसत्या डोळ्यांनी दर्शन घडणार, असा अंदाज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सुमारे साडेचार किमी व्यासाचा धुमकेतू या मार्चमध्येच शोधण्यात आला असून, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून त्याचे उत्तर-पश्चिम क्षितिजावर सायंकाळी सूर्यास्तानंतर नुसत्या डोळ्यांनी दर्शन घडणार, असा अंदाज आहे. स्वच्छ आकाश असल्यास हा नजारा डोळ्यांनी सहज टिपता येईल. सूर्यास्तानंतर जरा पश्चिमेस मृग नक्षत्राचे उजव्या बाजूस किंवा सप्तर्षीच्या डावीकडे मघा तारकेजवळ खालच्या बाजूस बघता येणार आहे. सध्या त्याची शेपटी लहान असून, २२ जुलै रोजी हा धुमकेतू पृथ्वीच्या अधिक जवळ येणार आहे.
आकाशातील ग्रहताऱ्यांविषयी जनमानसात एकप्रकारचे आकर्षण आहे. अवेळी एखाद्या पाहुण्याप्रमाणे दाखल होणारा धुमकेतू सूर्यमालेचाच घटक असून, त्याची लांब शेपटी सर्वांचेच लक्ष वेधून घेते. या नवागताच्या दर्शनार्थ आकाशप्रेमींनी सज्ज व्हावे. निओबाईस नावाचा हा धुमकेतू सी/२0२0 एफ ३ या नावानेही ओळखला जातो.
या नवीन पाहुण्याचे दर्शन आकाशप्रेमींनी घ्यावे, असे आवाहन विश्वभारती विज्ञान केेंद्राचे खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी केले आहे, तसेच सद्यस्थितीत पूर्व क्षितिजावर सूर्य, पृथ्वी व गुरू एकाच रेषेत आल्याने, गुरू या सर्वात मोठ्या ग्रहाचे दर्शन रात्रभर होत आहे. याचाही आकाशप्रेमींनी लाभ घ्यावा, असेही विश्वभारती विज्ञान केेंद्राचे खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी सांगितले.