दिलासा : सर्वोपचार रुग्णालयातील ऑक्सिजन टँक सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:18 AM2021-03-19T04:18:10+5:302021-03-19T04:18:10+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोविड रुग्णालयातील ऑक्सिजनची मागणीही वाढत आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत यंदाचा मार्च ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोविड रुग्णालयातील ऑक्सिजनची मागणीही वाढत आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत यंदाचा मार्च महिना घातक ठरत असून, गंभीर रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. रुग्णसंख्या वाढल्याने सर्वोपचार रुग्णालयात दररोज जवळपास ४५० पेक्षा जास्त ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासत आहे. गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची आवश्यकता आणखी भासण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्वोपचार रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन टँकचा परवाना मिळाल्याने बुधवारपासून ही टँक सेवा सुरू करता आली. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला असून, आगामी काळातील संभाव्य ऑक्टिजनचा तुटवडा आता भासणार नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
परवान्याच्या प्रतीक्षेत बंद होती ऑक्सिजन टँक
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला होता. ही बाब लक्षात घेता जिल्हा स्त्री रुग्णालय आणि सर्वोपचार रुग्णालयात १० केएल लिक्विड ऑक्सिजन टँकची उभारणी करण्यात आली होती; मात्र परवान्या अभावी ही सेवा मागील अनेक दिवसांपासून बंद होती. दरम्यानच्या काळात रुग्णसंख्या घटल्याने ऑक्सिजन टँक सुरू करण्याचे काम थंडबस्त्यात पडले होते. मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर तातडीने ऑक्सिजन टँक सुरू करण्याची प्रक्रिया करण्यात आली. सर्वोपचार रुग्णालयातील ऑक्सिजन टँकचा परवाना मिळताच बुधवारी ही टँक सेवा सुरू करण्यात आली. तसेच आठवडाभरापूर्वीच जिल्हा स्त्री रुग्णालयातील ऑक्सिजन टँक सुरू झाली. त्यामुळे आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे.