वाणिज्य वार्ताा - लोकोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या अकोला बाजार समितीचा उपक्रम प्रशंसनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:24 AM2021-02-17T04:24:22+5:302021-02-17T04:24:22+5:30
अकोला- कास्तकार व कृषी क्षेत्रासाठी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून अनेकांना मदतीचा हात देणाऱ्या अकोला कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीचे ...
अकोला- कास्तकार व कृषी क्षेत्रासाठी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून अनेकांना मदतीचा हात देणाऱ्या अकोला कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीचे लोकाभिमुख कार्य प्रशंसनीय असून, ही संस्था इतरांना प्रेरणादायी ठरावी असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
स्थानीय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लोकनेते स्व. वसंतराव धोत्रे मार्केट यार्ड सभागृहात रविवारी लोकनेते स्व. वसंतराव धोत्रे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यात समाजातील प्रतिभावंत व आत्महत्या केलेल्या कास्तकारांच्या कुटुंबियांना मदतीचा हात म्हणून शिष्यवृत्ती, अनुदान वितरण व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्य सत्कार सोहळा झाला. बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषदादा कोरपे, वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ, कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, कॉलेज ऑफ इंजिनियरिंग बाभूळगावचे प्राचार्य डॉ. एस.के. देशमुख, डॉ. अनंतराव भुईभार आदी मान्यवर उपस्थित होते.
दीप प्रज्वलन व लोकनेते स्व. वसंतराव धोत्रे यांच्या प्रतिमा पूजनाने या सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या मनोगतात बाजार समितीला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्याचे महान कार्य लोकनेते स्व. वसंतराव धोत्रे यांनी आपल्या कठोर मेहनतीने केले असल्याचे नमूद करीत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीची सतरावी सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात झाली. यात लेखा ज्ञापन वाचन, वार्षिक अहवाल वाचन व वार्षिक आर्थिक पत्रकांचे वाचन करून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही सर्वसाधारण सभा झाली. यावेळी अनेक पुरस्कारांचे स्मृतिचिन्हे प्रदान करून सत्कारमूर्तींचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक सभापती शिरीष धोत्रे यांनी करून बाजार समितीच्या सेवाभावी उपक्रमांची माहिती दिली. संचालन बाजार समितीचे सचिव सुनील मालोकार यांनी, तर आभारप्रदर्शन बाजार समितीचे उपसभापती नीळकंठराव खेडकर यांनी मानले.
फाेटाे - आर/युजर/एडीव्हीटी/ १६ एपीएमसी
८ बाय १२