आयुक्त रस्त्यावर; ४५२ दांडीबहाद्दर सफाई कामगारांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:33 PM2019-09-20T12:33:39+5:302019-09-20T12:35:08+5:30
आयुक्त संजय कापडणीस यांच्या पाहणीत केवळ दोन दिवसांत ४५२ सफाई कामगार अनुपस्थित असल्याचे आढळून आले.
अकोला: मनपाच्या आस्थापनेवरील ७४४ सफाई कर्मचाऱ्यांसह पडीत प्रभागात नियुक्त केलेल्या खासगी कामगारांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी खुद्द महापालिका आयुक्त संजय कापडणीस रस्त्यावर उतरले आहेत. सकाळी ७ वाजता मोटारसायकलने घरातून बाहेर पडणाºया आयुक्तांनी साफसफाईच्या कामाचा प्रत्यक्षात आढावा घेतला असता, एक-दोन नव्हे, तर ४५२ पेक्षा अधिक सफाई कामगार अनुपस्थित आढळून आले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्तांनी प्रभावी कारवाईचा बडगा उगारला आहे.
ऐन सणासुदीच्या दिवसांत शहरात सर्वत्र साफसफाई व घाणीचे ढीग साचल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पावसाच्या दिवसांत साचलेल्या घाणीमुळे शहरात साथरोगांनी डोके वर काढले असून, महापालिकेची आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी ठरत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये सातत्याने उमटत आहे. प्रशासनाने प्रभागात दैनंदिन साफसफाई करण्यासाठी प्रशासकीय आणि पडीत प्रभाग अशी रचना तयार केली. आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांचे वेतन तसेच पडीत प्रभागातील खासगी सफाई कामगारांच्या देयकांपोटी महिन्याकाठी अडीच ते तीन कोटींची उधळण होत असल्याची परिस्थिती आहे. तरीही शहरात अस्वच्छता आढळून येत असल्यामुळे मनपाच्या संबंधित विभागाची यंत्रणा संशयाच्या घेºयात सापडली आहे. या प्रकाराची दखल घेत महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी सकाळी ७ वाजतापासूनच चक्क मोटारसायकलवर बसून प्रभागांमधील साफसफाईच्या कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या पाहणीत आस्थापनेवरील तसेच खासगी सफाई कामगार पूर्वसूचना न देताच परस्पर पळ काढत असल्याचे आढळून येत आहे.
आरोग्य निरीक्षक नव्हे, पांढरे हत्ती!
आरोग्य निरीक्षकांकडून दैनंदिन स्वच्छतेची माहिती घेऊन त्यांना सूचना, निर्देश देण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाºयांची आहे. तसेच प्रत्येक प्रभागात प्रत्यक्षात देखरेख ठेवण्याचे काम आरोग्य निरीक्षकांचे आहे. आज रोजी शहरात ठिकठिकाणी घाण, अस्वच्छता साचली असताना आरोग्य निरीक्षकांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
दोन दिवसांत ४५२ कर्मचारी अनुपस्थित
आयुक्त संजय कापडणीस यांच्या पाहणीत केवळ दोन दिवसांत ४५२ सफाई कामगार अनुपस्थित असल्याचे आढळून आले. त्यांची हजेरी घेणारे मनपा कर्मचारी व देखरेख ठेवणारे आरोग्य निरीक्षक यांच्या बयानात विसंगती असल्यामुळे आरोग्य व स्वच्छता विभागाचा कारभार हवेत सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. ४५२ कर्मचाऱ्यांमध्ये आस्थापनेवरील १८४ व पडीत प्रभागातील २६८ खासगी कामगारांचा समावेश आहे.
प्रभागांमधील साफसफाईच्या बदल्यात आस्थापना तसेच खासगी सफाई कामगारांच्या वेतनावर महिन्याकाठी कोट्यवधींचा खर्च होत असताना शहरात घाणीची समस्या दिसून येते. त्यामुळे दररोज सकाळी प्रत्येक प्रभागात जाऊन स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. कर्तव्यात कसूर करणाºयांची गय केली जाणार नाही.
-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.