धूळमुक्त शहरासाठी समिती गठित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:46 PM2020-01-24T12:46:20+5:302020-01-24T12:46:25+5:30
शहर धूळमुक्त करण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाºयांची समितीही गठित केली. ही समिती आता त्यासाठी काम करणार आहे.
अकोला: प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड असलेल्या राज्यातील १८ शहरांमध्ये अकोल्याचाही समावेश असल्याचे ‘लोकमत’ने सातत्याने मांडले. पालकमंत्री बच्चू कडू यांनीही दखल घेतली. ही बाब पुन्हा २३ जानेवारीच्या अंकात उमटताच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. शहर धूळमुक्त करण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाºयांची समितीही गठित केली. ही समिती आता त्यासाठी काम करणार आहे.
अकोला शहरातील धूळ तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिलेले आहेत. त्या प्लॅननुसार काम करण्याची जबाबदारी महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. तरीही या दोन्ही यंत्रणांकडून त्याबाबत कोणत्याच उपाययोजनांना सुरुवात झाली नाही. पालकमंत्री कडू यांनी १५ जानेवारी रोजी अधिकाºयांना धारेवर धरले होते. धुळीबाबत काहीच न झाल्याने ‘लोकमत’ने २२ जानेवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले. त्यावर जिल्हाधिकारी पापळकर यांनी संबंधित विभागांची बैठक तातडीने बोलावली. या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दिनकर नागे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना उपअभियंता राजेंद्र धिनमिने, मनपा उपायुक्त वैभव आवारे, मनपा कार्यकारी अभियंता अजय गुजर, जान्डू कन्स्ट्रक्शनचे एम. एस. चंदनबटवे उपस्थित होते.
- समितीमध्ये या अधिकाºयांचा समावेश
धूळमुक्त शहर समितीमध्ये अध्यक्ष म्हणून महापालिकेचे सहायक आयुक्त, उपाध्यक्ष- पोलीस उपनिरीक्षक, सदस्य सचिव म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, सदस्यांमध्ये निवासी नायब तहसीलदार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, महापालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) मनपा, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचा समावेश आहे.
- उपाययोजनांचा अहवाल मागविला!
शहरात जेथे रस्ते, अन्य विकास कामे सुरू आहेत. त्या संबंधित ठेकेदाराने धूळ नियंत्रणाबाबत उपाययोजना कराव्या, यासंदर्भात प्रत्यक्ष कामाचे ठिकाणनिहाय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. जेथे रस्त्याचे मुरूम पसरविण्याचे काम सुरू असेल, तेथे पाण्याचा शिडकावा करावा, वळण रस्त्यांचे डांबरीकरण करावे, त्यामुळे धुळीचा उद्भव कमी होईल, असेही बैठकीत सांगण्यात आले.
फोटो : अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला उपस्थित अधिकारी.