आरोग्यसेवेवर वॉच ठेवणाऱ्या समित्याच बेदखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 01:52 PM2019-08-07T13:52:33+5:302019-08-07T13:52:48+5:30
रुग्ण कल्याण समिती, तालुका नियामक सभा घेण्याचा उपक्रम आरोग्य विभागातून बेदखल करण्यात आला आहे.
- सदानंद सिरसाट
अकोला : प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालये, सर्वोपचार रुग्णालयातील आरोग्य सेवा सर्वसामान्यांना कशी पुरवली जाते, याचा धांडोळा घेण्यासाठी असलेल्या रुग्ण कल्याण समिती, तालुका नियामक सभा घेण्याचा उपक्रम आरोग्य विभागातून बेदखल करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांबाबत मे २०१९ अखेरपर्यंत तालुकानिहाय ६० सभा घेण्याचे नियोजन असताना त्यापैकी एकही सभा झालीच नसल्याचा अहवाल आहे, तर नियामक मंडळाच्या १८० मधून केवळ २२ सभा झाल्या आहेत. यावरून जिल्ह्यातील आरोग्यसेवेकडे हा विभाग किती लक्ष देत आहे, हे स्पष्ट होत आहे.
रुग्णकल्याण समितीच्या कामाचा आढावा घेताना हा प्रकार उघड झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना दिलेल्या माहितीनुसार, रुग्णकल्याण समितीच्या बैठका, कार्यकारी मंडळाच्या बैठकाही अत्यल्प झाल्या आहेत. ग्रामीण भागातील सात तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील रुग्णकल्याण समितीच्या बैठका घेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार अकोला तालुक्यासाठी १२, अकोट-६, बाळापूर-८, बार्शीटाकळी-८, मूर्तिजापूर- ८, पातूर-१०, तेल्हारा-८ असे उद्दिष्ट आहे. त्यापैकी एकही सभा मे २०१९ पूर्वीच्या काळात झालेली नाही, तर तालुकानिहाय कार्यकारी मंडळाच्या बैठकांचे १८० एवढे उद्दिष्ट आहे. त्यापैकी केवळ २२ बैठकाच झाल्या आहेत. १५८ सभा झाल्याच नसल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आली. हा प्रकार आरोग्य सेवा पुरती वाºयावर सोडण्याचा असल्याचे उघड होत आहे.
तर शहरी भागातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय या संस्थांतर्गत मे २०१९ पर्यंतच्या काळात १४ नियामक सभा घेण्याचे उद्दिष्ट होते; मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने सभा घेता आल्या नाहीत, असे सांगण्यात आले. आरोग्यसेवा सुरळीत चालण्यासाठी यापुढे तत्काळ नियामक व कार्यकारी मंडळाच्या सभा घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.