शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:18 AM2021-04-02T04:18:21+5:302021-04-02T04:18:21+5:30
शेतकरी ते थेट विक्री याबाबत एक चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनाने आता पाऊल उचलले आहे. बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला ...
शेतकरी ते थेट विक्री याबाबत एक चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनाने आता पाऊल उचलले आहे. बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव, ग्राहकांना ताजी फळे, भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होईल अशा दुहेरी उद्देशाची ही संकल्पना राज्यात सुरू करण्यात आली आहे. तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडे पुरवठा साखळी कार्यरत राहण्यासाठी व ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पुरवठा होण्यासाठी या अभियानात थेट विक्रीसाठी इच्छा व्यक्त करणाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचे लागवड क्षेत्र, वाण निवड, निविष्ठा वापराबाबत व बाजारात असलेल्या मागणीबाबत जागृती करण्याचे महत्त्वाचे काम कृषी विभागाकडे देण्यात आले आहे. फळे भाजीपाला व इतर शेतीमाल उत्पादित झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांमध्ये शेतीमालाची स्वच्छता व प्रतवारी करणे, ग्रेडिंग करणे, पॅकिंग करणे, विक्री व्यवस्थापन याबाबत तांत्रिक प्रशिक्षणाची सोयही करण्यात आली आहे. जिल्ह्यात ७०० शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे लक्ष्यांक देण्यात आले होते. यापैकी ६८७ शेतकरी गट व १३ शेतकरी उत्पादक कंपन्यांना विक्री स्थळांशी जोडण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील ३०० ठिकाणी प्रत्यक्षात माल विक्री सुरू झाली आहे. कृषी विभागाच्या आत्मा विभागांतर्गत ही योजना राबविल्या जात आहे.
--बॉक्स--
मालाची ८,४८८ मेट्रिक टन विक्री
रयत बाजार योजनेंतर्गत ३०० स्थळांवर ८ हजार ४८८ मेट्रिक टन मालाची विक्री करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक अकोला तालुक्यात ७८०० मे. टन मालाची विक्री झाली आहे.
--बॉक्स--
मिळालेला लक्ष्यांक
७००
निवड झालेले गट व उत्पादक कंपन्या
७००
जोडलेले शेतकरी गट
६८७
जोडलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या
१३
प्रत्यक्षात विक्री सुरू असलेली स्थळे
३००
महिनाअखेर झालेली विक्री (मे.टन)
८४८८.५०
--बॉक्स--
लॉकडाऊनमध्ये १०.८४ कोटींची उलाढाल
मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचविला होता. कुठलीही योजना कार्यान्वित नसताना जून २०२० महिन्यापर्यंत १० कोटी ८४ लाख रुपयांची उलाढाल झाली होती.