तेव्हा सामान्यांनी शरद पवारांचे कौतुक केले; त्यांनीही राज्यात ओला दुष्काळ जाहिर करायला हवा होता- अरविंद जगताप
By प्रवीण खेते | Published: November 6, 2022 09:02 PM2022-11-06T21:02:05+5:302022-11-06T21:02:14+5:30
सामान्य माणूस आणि राजकारणी यांच्यात वनसाईड लव्ह नको
अकोला: शरद पवार पावसात भिजत भाषण करतानाचे फोटो प्रत्येक सामान्य माणसाने सोशल मीडियावर शेअर करून त्यांचे कौतुक केले होते. जेवढ्या कौतुकाने सामान्य माणसाने त्यांचे कौतुक केले होते, तेवढ्याच आत्मियतेने त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहिर करायला हवा होता. सामान्य माणूस म्हणून अशी अपेक्षा व्यक्त करत, राजकारणी आणि सामान्य माणूस यांच्यात वनसाईड लव्ह नको, असे वक्तव्य साहित्यिक अरविंद जगताप यांनी रविवारी अकोल्यात केले.
अकोल्यातील वाशिम रोड स्थित प्रभात किड्स स्कूल येथे आयोजित विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाच्या समोरपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल मिटकरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख,विजय कौसल, मोनिका राऊत, संग्राम गावंडे, डॉ. गजानन नारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना जगताप म्हणाले की, सर्वसामान्य माणूस म्हणून आम्हाला सत्ताधारी आणि विरोधक दोघांची भिती वाटते. आम्ही सत्ताधाऱ्यांकडे गेलो रोजगाराचं बघा. आरक्षणाचं बघा, एसटी कर्मचाऱ्यांचं बघा, दुष्काळाचं बघा, तेव्हा ते नाही म्हणाले आता हे नाही म्हणतात. सत्तेत कुणीही असू द्या युवकांनी ही आपल्यातील कौशल्य योग्य ठिकाणी वापरून सामाजीक भान जपण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी युवकांना दिला. कोणत्याची गोष्टीचा अहंकार येऊ नये तो सत्ताधारी असो की लेखक. कुणावर कधी कशी वेळ येईल हे सांगता येत नाही त्यामुळे वास्तवात, जमिनीवर राहण्याचा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, कुणीही उठतं शेतकऱ्यावर कविता करतं. त्यांला शेती आणि शेतकऱ्यांविषयी ढेकळ माहित नसतं. शेतकऱ्याच्या नावाने आंदोलने करायचे, आंदोलने करायचे एकदा शेतकऱ्याच्या नावाने तुम्हाला नेता म्हणून मुंबईत पाठविले की, तोंड दाखवायचे नाही, अशी परिस्थिती सध्या राज्यात झाल्याचे त्यांनी म्हटले. कार्यक्रमाचे संचालन अभिषेक उदावंत यांनी, तर आभार निरज आवंडेकर यांनी मानले.