सोयाबीन बियाण्याची शेतक-यांना नुकसानभरपाई
By admin | Published: November 30, 2014 10:29 PM2014-11-30T22:29:05+5:302014-11-30T22:29:05+5:30
अमरावती विभागात ८६३ तक्रारींचा निपटारा.
संतोष येलकर/अकोला
खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याबाबत अमरावती विभागातील शेतकर्यांकडून करण्यात आलेल्या १ हजार ५११ तक्रारींपैकी ८६३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, संबंधित बियाणे कंपन्यांकडून शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी केल्यानंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नाही, त्यामुळे शेतकर्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या; मात्र बर्याच शेतकर्यांनी दुबार पेरणी करूनही सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. यासंदर्भात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागाकडे शेतकर्यांकडून मोठय़ा प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या. या पृष्ठभूमीवर राज्याच्या कृषी आयुक्तालयामार्फत शेतकर्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती कृषी विभागाच्या प्रत्येक विभाग व जिल्हा स्तरावरील कार्यालयाकडून मागविण्यात आली होती. प्राप्त तक्रारींचा निपटारा करून, नुकसानभरपाईपोटी संबंधित शेतकर्यांना, त्यांनी घेतलेल्या सोयाबीन बियाण्याची रक्कम परत करण्याचे आदेश कृषी विभागामार्फत संबंधित बियाणे कंपन्यांना देण्यात आले. त्यानुसार कृषी विभागाच्या तालुकास्तरीय चौकशी समिती अहवालाच्या आधारे शेतकर्यांना संबंधित बियाणे कंपन्यांकडून नुकसानभरपाई देण्याचे काम सुरू करण्यात आले. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात ३ हजार ६५0 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याबाबत १ हजार ५११ तक्रारी शेतकर्यांकडून करण्यात आल्या. त्यापैकी ८६३ तक्रारींचा संबंधित बियाणे कंपन्यांकडून आतापर्यंत निपटारा करण्यात आला असून, शेतकर्यांना ८१ लाख ५८ हजार रुपयांची नुकसानभरपाई बियाणे कंपन्यांकडून देण्यात आली.
अमरावती विभागात १ हजार ५११ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी आतापर्यंत ८६३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, संबंधित शेतकर्यांना ८१ लाख ५८ हजार रुपयांची नुकसानभरपाई बियाणे कंपन्यांकडून देण्यात आली. उर्वरित तक्रारींचा निपटारा तातडीने करून, शेतकर्यांना बियाण्याची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश बियाणे कंपन्यांना देण्यात आले असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक एस.आर. सरदार यांनी सांगीतले.