परंपरागत मतपेढी कायम ठेवत इतर मतांसाठी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 12:54 PM2019-10-14T12:54:06+5:302019-10-14T12:54:16+5:30
विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष परंपरागत मतपेढी कायम ठेवण्यावर भर देऊन, इतर मतांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: लोकसभा निवडणुकीसाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी परंपरागत दलित मतांंना ओबीसींची जोड देत उभारलेल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये ‘एमआयएम’चा सहभाग झाल्यानंतर मुस्लीम मतांमध्ये विभाजन होईल, असा कयास होता; मात्र लोकसभा निवडणुकीत एमआयएमची मते वंचित बहुजन आघाडीकडे वळली नसल्याचे चित्र अनेक मतदारसंघात स्पष्टपणे समोर आले. या पृष्ठभूमीवर विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष परंपरागत मतपेढी कायम ठेवण्यावर भर देऊन, इतर मतांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.
अकोल्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत मराठा, मुस्लीम, माळी, कुणबी, दलित या समाजांचे प्रमुख मतदान आहे. त्यामुळे साहजिकच मतदारसंघात उमेदवारी देताना तेथील सामाजिक समीकरणांचा प्रत्येक पक्षाने विचार केला आहे. पक्षाची परंपरागत मते, तसेच आपल्या समाजाची मते आपल्यालाच मिळतील, हे गृहीत धरून विजयाचे गणित प्रत्येक उमेदवार मांडत आहे. दलित-मुस्लीम मतांची मोट बांधण्याची अॅड. आंबेडकरांची खेळी फारशी यशस्वी झाली नसली तरी, मुस्लीम समाजात वंचित बहुजन आघाडीचा चंचूप्रवेश नक्कीच झाला आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेत मुस्लीम मते आघाडीकडेच कायम राहतील, अशी व्यूहरचना केली आहे. अकोला पश्चिममध्ये अल्पसंख्याक आयोगाचे राष्टÑीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही यांनी सभा घेऊन परंपरागत मतपेढीला धक्का बसणार नाही, याची दक्षता घेतली. शरद पवार यांनी बाळापूर मतदारसंघात प्रचार सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. दुसरीकडे एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांनी बाळापुरात सभा घेऊन मुस्लीम समाजाला साद घातली. एकीकडे भाजपविरोधी मतांमध्ये आपापला वाटा मजबूत करण्यासाठी स्पर्धा असताना युतीमध्ये मात्र आपले मतदार कायम टिकवून ठेवण्याची कसरत सुरू आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ आॅक्टोबर रोजी अकोल्यात येत असल्याने भाजपाच्या गोटात उत्साह आहे, तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळापूर मतदारसंघातील दौरा रद्द केल्याने शिवसैनिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.