‘ईव्हीएम’मध्ये बिघाड झाल्यास तक्रार करा; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:36 PM2019-04-18T12:36:19+5:302019-04-18T12:36:27+5:30
लेखी स्वरुपात तक्रार करावी तसेच सी व्हिजील अॅपवरून थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, असे आवाहन वंचित बहूजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
अकोला : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी राज्यातील दहा मतदारसंघांमध्ये मतदान होत असून, अनेक दिग्गजांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. विविध मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या तक्रारी येत असल्याच्या पृष्ठभूमीवर कार्यकर्त्यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात तक्रार करावी तसेच सी व्हिजील अॅपवरून थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, असे आवाहन वंचित बहूजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघासह विदर्भ मराठवाड्यातील दहा मतदार संघांमध्ये सकाळी सात वाजतापासून मतदानास सुरुवात झाली आहे. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून, मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी बाहेर पडत आहेत. विविध मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये बिघाड होण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे मतदान प्रक्रियेस विलंब होत आहे. या प्रकारामुळे ईव्हीएम मशिन हॅक होण्याच्या चर्चाही मतदारांमध्ये आहे. या पृष्ठभूमीवर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मतदारांना तसेच कार्यकर्त्यांना तक्रार करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. जितका वेळ मशीन बंद आहे. तितका वेळ मतदानासाठी वाढवून देण्याचीही मागणी करावी, असेही अॅड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.