अकोला जिल्हा परिषद सीईओविरुद्ध पोलिसांत तक्रार
By admin | Published: January 6, 2016 01:58 AM2016-01-06T01:58:50+5:302016-01-06T01:58:50+5:30
सीईओंच्या तक्रारीवरून कारवाई, पोलिसांनी आंदोलन दडपले!
अकोला - बाळापूर तालुक्यातील कळंबा खुर्द येथील रहिवासी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागात कक्षसेवक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचार्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षासमोर सुरू असलेले आंदोलन पोलिसांच्या मदतीने दडपल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी घडला. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या तक्रारीनंतर हे आंदोलन पोलिसांनी दडपले; मात्र त्यानंतर काही वेळातच आंदोलकाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कळंबा खुर्द येथील भास्कर जगन्नाथ ठाकरे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाळापूर उपविभागात कक्षसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कळंबा येथे घर असून, या घराचा १९९८ ते २00५ या आठ वर्षांतील कर नियमित भरला आहे. या ठिकाणी घर बांधायचे असल्याने त्यांनी गृहकर्जासाठी अर्ज केला होता. त्यांना सदर जागेचा नमुना-८ मागण्यात आला. त्यानंतर ठाकरे यांनी ग्रामपंचायतकडे नमुना-८ साठी अर्ज केला; मात्र ग्रामसेवकाने ठाकरे यांच्या जागेची नोंदच नसल्याने नमुना-८ देता येणार नसल्याचे सांगितले. यावरून जागेची नोंद नसताना आठ वर्षे कर वसूल केला, मग तो गेला कोठे, असा प्रश्न उपस्थित करून ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीकरिता बाळापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांकडे तक्रार केली; मात्र यावर कोणतीही चौकशी झाली नाही. नंतर ठाकरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार केली. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले; मात्र थातूर-मातूर चौकशीनंतर प्रकरण दडपण्यात आले. ठाकरे यांनी मात्र स्वस्थ न बसता न्यायासाठी ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. ग्रामविकास मंत्र्यांनी १८ सप्टेंबर २0१४ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना आदेश देऊन या प्रकरणाची तातडीने चौकशी व कारवाईचा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट केले; मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत अद्यापही चौकशी करण्यात आली नाही. त्यामूळे हतबल झालेल्या ठाकरे यांनी ३१ डिसेंबर २0१५ पासून मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या कक्षासमोर सकाळी ११ ते ५ या वेळेत ठिय्या आंदोलन सुरू केले. कुणालाही त्रास न देता, कक्षाच्या समोरील एका कोपर्यात ते शासकीय वेळेत आंदोलन करीत व कार्यालय बंद होण्याच्या आधी निघून जात होते; मात्र मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी आंदोलनाची दखल न घेता सदर आंदोलकास पोलिसांच्या मदतीने कक्षासमोरून धाकदपट करून उचलून नेले. आंदोलकाचे आंदोलन दडपल्याने त्यांनी याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली.