विहिरीतील गाळ काढण्याचा देयकात घोळ; मनपाचा अभियंता नीरज ठाकूरविरुद्ध पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 01:28 PM2019-01-25T13:28:47+5:302019-01-25T13:28:54+5:30
अकोला: प्रभाग क्रमांक १२ मध्ये जलप्रदाय विभागाचे कनिष्ठ अभियंता नीरज ठाकूर यांनी तीन विहिरींमधील गाळ काढण्याच्या मोबदल्यात अदा केल्या जाणाऱ्या देयकाच्या फाइलमध्ये घोळ केल्याची बाब महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या निदर्शनास आल्यानंतर अभियंता ठाकूरविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
अकोला: प्रभाग क्रमांक १२ मध्ये जलप्रदाय विभागाचे कनिष्ठ अभियंता नीरज ठाकूर यांनी तीन विहिरींमधील गाळ काढण्याच्या मोबदल्यात अदा केल्या जाणाऱ्या देयकाच्या फाइलमध्ये घोळ केल्याची बाब महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या निदर्शनास आल्यानंतर अभियंता ठाकूरविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. ठाणेदार विलास पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मार्च २०१८ मध्ये महान धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याचे पाहून शहरातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने व प्रशासनाने समन्वय साधत १४ कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. शासनाने या प्रस्तावाला कात्री लावत महत्त्वाच्या कामांचा समावेश करण्याचे निर्देश देत ३ कोटी २८ लाख रुपये निधी मंजूर केला होता. यामध्ये नवीन सबमर्सिबल पंप, हातपंप कार्यान्वित करणे, विहिरीतील गाळ काढून खोलीकरण करणे, नादुरुस्त सबमर्सिबल पंप दुरुस्तीचा समावेश होता. जलप्रदाय विभागामार्फत कंत्राटदारांनी सदर कामे केल्यानंतर या विभागातील कनिष्ठ अभियंत्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून देयकांच्या फायली तयार केल्या. या कामांचे देयक प्राप्त व्हावे, या उद्देशातून सदर फायली मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे स्वाक्षरीसाठी सादर करण्यात आल्या होत्या. आयुक्त कापडणीस यांनी प्रभाग क्रमांक १२ मधील तीन विहिरींचा गाळ काढून खोलीकरण करण्याच्या फायली तपासल्या असता, संबंधित कनिष्ठ अभियंता नीरज ठाकूर यांनी मोजमापात घोळ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अभियंता नीरज ठाकूर यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचा आदेश जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांना शुक्रवारी देण्यात आला होता. त्यानंतर जलप्रदाय विभागाचे हरिदास गुलाबराव ताठे यांनी मानसेवी कनिष्ठ अभियंता नीरज ठाकूर याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली असून, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.