रोजगार सेवकाने फसवणूक केल्याची तक्रार
By admin | Published: April 24, 2017 02:08 AM2017-04-24T02:08:06+5:302017-04-24T02:08:06+5:30
खेट्री : येथील रोजगार सेवक शे. उस्मान यांनी फसवणूक केल्याचा आरोप अल्पभूधारक शेतकरी जानकीराम दौलत तिडके यांनी पातूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
खेट्री येथील शेतकऱ्याचे बीडीओंना निवेदन
खेट्री : येथील रोजगार सेवक शे. उस्मान यांनी आपली ३० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप अल्पभूधारक शेतकरी जानकीराम दौलत तिडके यांनी १९ एप्रिल रोजी पातूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
तिडके यांनी निवेदनात म्हटले आहे, की २०१५ मध्ये आपण रोजगार सेवक शे. उस्मान यांना २५ हजार रुपये दिले. काही दिवसांनंतर पं.स.मध्ये बांधकाम अभियंता किसन वानखडे यांच्यासमोर उर्वरित पाच हजार रुपये रोजगार सेवकाले दिले. काही दिवसांपर्यंत विहीर मंजूर न झाल्यामुळे शेतकरी बांधकाम अभियंत्यास भेटलो असता त्यांनी म्हटले, की मला फक्त पाच हजार रुपये मिळाले ते मी परत देतो. अभियंत्यांनी मला पाच हजार रुपयांचा धनादेश दिला. बँकेत गेलो असता त्यांच्या खात्यात पैसे नसल्याचे रोखपालांनी सांगितले. त्यामुळे रोजगार सेवक व अभियंता या दोघांनी संगतमत करून माझी फसवणूक केली. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी तिडके यांनी निवेदनात केली आहे.
मी कोणाचीही फसवणूक केली नाही. आरोप करणे सोपे आहे. सिद्ध करून दाखविणे हे महत्त्वाचे असते. ही तक्रार बिनबुडाची आहे.
-शे. उस्मान रोजगार सेवक, खेट्री.