पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची कामगार आयुक्त, ‘पीएफ’ कार्यालयाकडे तक्रार
By admin | Published: July 3, 2017 01:44 AM2017-07-03T01:44:00+5:302017-07-03T01:44:00+5:30
वर्षोगणतीपासून कर्मचाऱ्यांवर अन्याय : परस्पर विकले पेट्रोल पंप
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील एका नामांकित पेट्रोल पंप संचालकांकडून वर्षोगणतीपासून पिळवणूक सुरू असून, कोणत्याही प्रकारच्या सुविधा कर्मचाऱ्यांना दिल्या जात नसल्याची तक्रार भविष्यनिर्वाह निधी आणि सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे २२ जून १७ रोजी सामूहिकपणे करण्यात आली आहे. याप्रकरणी आता काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
स्थानिक रेल्वेस्थानक मार्गावरील एका नामांकित पेट्रोल पंपावर गेल्या २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी नियमित गोळा करण्यात आला नसून, अनेकांची नावे गहाळ करण्यात आली आहेत. दरम्यान, सदर पेट्रोल पंपाची विक्री परस्पर करण्यात आली, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोजगाराबाबत अस्थिरता निर्माण झाली आहे. सिव्हिल लाइन चौकातील कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाचे उपायुक्त आणि गोरक्षण मार्गावरील सहायक कामगार आयुक्त यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनातील फरक मिळवून द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. पेट्रोल पंप संचालकांनी १९९४ पासून ‘पीएफ’ची रक्कम भरत असल्याचे कर्मचाऱ्यांना सांगितले. २० पेक्षा जास्त कर्मचारी पेट्रोल पंपावर कार्यरत असतानादेखील पीएफ कार्यालयात ही संख्या कमी दर्शविण्यात आली. येथील एका कर्मचाऱ्याने तक्रार केल्याने ११ कामगारांचा पीएफ नाममात्र भरला गेला आहे. कर्मचाऱ्यांना वेतनपत्रक, हजेरीपत्रक आणि पीएफ स्लिप दाखविली गेली नाही, असेही तक्रारीत नमूद आहे. तक्रारीवर ३४ कर्मचाऱ्यांच्या नावाचा उल्लेख असला, तरी स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये अनिल महाजन, राजू चतरकर, विजय उपरीकर, आत्माराम घाटोळे, रमेश किर्लोस्कर, अनिल रानडे, उमेश नेवारे, दुर्गेश तायडे, संजय तडस, गजानन कांबळे, बहादूरसिंग ठाकूर, संतोष इंगळे, विजय खोत, अक्षय जवादे, अविनाश धांडे, अमोल साखरे, सतीश सांगोकार, प्रमोद सोंडकर, पवन डांगे, संतोष दाणे, संदीप चौधरी, शुभम आमले अशा मोजक्याच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.