खामगाव तालुक्यातील आदिवासी कार्यालयात हैदोस घालणार्यांची पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:09 PM2017-12-17T23:09:01+5:302017-12-17T23:09:09+5:30
अकोला : बुलडाणा जिल्हय़ातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील चौथ्या वर्गाच्या विद्यार्थिनीवर २0१६ मध्ये लैंगिक अत्याचार झाल्यानंतर या आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून, कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बुलडाणा जिल्हय़ातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील चौथ्या वर्गाच्या विद्यार्थिनीवर २0१६ मध्ये लैंगिक अत्याचार झाल्यानंतर या आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून, कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कर्मचार्यांच्या मागण्या वरिष्ठ स्तरावर प्रलंबित असताना या कर्मचार्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी शनिवारी आदिवासी प्रकल्प कार्यालयात हैदोस घातल्याची तक्रार प्रकल्प अधिकारी विनिता सोनवने यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे.
पाळा येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर आदिवासी आयुक्तांनी या आश्रमशाळेची मान्यता रद्द केली होती. त्यानंतर येथील कर्मचार्यांवर फौजदारी कारवाई झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. यामध्ये सलीम मुनाफ शेख यांचे गत आठवड्यातच निधन झाले असून, त्यांची पत्नी, मुलगा व वडील यांच्यासह निलंबित कर्मचारी बी. व्ही. लाहुडकर, ए. एम. शेळके, के. आर. पवार, डी. आर. खरात, इ. डी. वाघ, व्ही. आर. वाघ, एस. बी. लाखे व एन. डी. अंभोरे यांनी शनिवारी अकोल्यातील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय गाठून प्रकल्प अधिकारी विनिता सोनवने यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर कार्यालयात तोडफोड करीत कर्मचार्यांना शिवीगाळ केली. यामधील सलीम मुनाफ शेख यांचा गत आठवड्यातच मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी शाहीन परवीन सलीम शेख व त्यांचे वडील तसेच मुलगा यांचा या तोडफोडमध्ये समावेश असल्याचे सोनवने यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पाळा येथील आश्रमशाळेतून निलंबित झालेल्या या कर्मचार्यांनी हैदोस घालून तोडफोड केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिसांनी रात्री उशिरा या कर्मचार्यांविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.