शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड होत नसल्याच्या तक्रारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 04:40 PM2020-02-04T16:40:15+5:302020-02-04T16:40:24+5:30
विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र कसे द्यावेत, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
अकोला : इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा १६ फेब्रुवारी होणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिले आहेत; परंतु शाळांच्या लॉगीनमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड होतच नसल्याच्या शिक्षकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र कसे द्यावेत, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १६ फेब्रुवारी रोजी सर्वच जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातून दोन्ही परीक्षा जवळपास १२ हजारावर विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. या परीक्षेसंबंधीची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये परीक्षा परिषदेने उपलब्ध करून दिले असले तरी या लॉगीनमध्ये शिष्यवृत्तीचे प्रवेशपत्र डाउनलोड होत नसल्याचे समोर आले. अनेक शाळांनी लॉगीनमध्ये सातत्याने प्रयत्न करूनही विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड होत नाहीत. त्यामुळे शाळेसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. परीक्षा तोंडावर असताना, परीक्षेचे प्रवेशपत्र मिळाले नाही तर विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागणार तर नाही ना. अशी भीती शिक्षक, पालक व्यक्त करीत आहेत. परीक्षा परिषदेच्या दोन्ही संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रे डाउनलोड करण्यात अडचणी येत आहेत. यावर परीक्षा परिषदेने तातडीने तोडगा काढावा आणि विद्यार्थ्यांना सहज प्रवेशपत्र उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पालक व शिक्षकांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध होण्यासाठी परीक्षा परिषदेशी संपर्क साधण्यात येईल. संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शाळांच्या लॉगीनवर प्रवेशपत्र डाउनलोड होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक