तक्रारी भ्रष्टाचाराच्या, तयारी निवडणुकीची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2017 01:54 AM2017-06-02T01:54:59+5:302017-06-02T01:54:59+5:30

पीआरसीला निवेदन : खासदार, आमदारांनी केल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी !

Complaints of corruption, preparation of elections! | तक्रारी भ्रष्टाचाराच्या, तयारी निवडणुकीची!

तक्रारी भ्रष्टाचाराच्या, तयारी निवडणुकीची!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हा परिषदेच्या कारभारातील भ्रष्टाचाराच्या काही मुद्यांवर पंचायत राज समितीला तक्रारी देत त्यातून चौकशी आणि कारवाईची मागणी जिल्ह्याचे खासदार संजय धोत्रे, अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी केली, त्यातून येत्या काळातील जिल्हा परिषद निवडणुकीचा निशाणा साधण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.
जिल्हा परिषदेतील अनेक मुद्यांबाबत आमदार रणधीर सावरकर यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केले आहेत. काही प्रकरणात प्रशासनाकडेही तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी पंचायत समित्यांमध्ये २९ लाख रुपये खर्च करून लावण्यात आलेल्या सीसी कॅमेरा खरेदी प्रकरणातील अनियमिततेप्रकरणी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी गुरुवारी समितीचे अध्यक्ष प्रकाश भारसाकळे यांना निवेदनातून केली आहे. सोबतच कासली खुर्द येथील तलाव दुरुस्तीच्या कामाला मंजुरी न देणाऱ्या जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष शरद गवई, अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली. सोबतच शिक्षण विभागातील आंतरजिल्हा बदली, चुकीच्या प्रवर्गात नियुक्ती प्रकरणांच्या प्रचंड तक्रारी केल्या आहेत. त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही, त्यामुळे शासनाच्या पारदर्शक कारभारावर जनतेचा रोष निर्माण झाला आहे, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत १३ लाख ६८ हजार ५७८ रुपये खर्च करून प्रशिक्षण पुस्तिकांची छपाई करण्यात आली, त्याचीही चौकशी झाली नाही. बोरगाव मंजू येथील रोजगार हमी योजनेतील रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचारप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, ही मागणीही आमदार सावरकर यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात उपस्थित होते.

Web Title: Complaints of corruption, preparation of elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.