आठवडाभरात आरोग्य संस्थांचे इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल व फायर ऑडिट पूर्ण करा! - जिल्हाधिकारी पापळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 10:25 AM2021-01-12T10:25:08+5:302021-01-12T10:25:29+5:30
Akola News फायर ऑडिट १८ जानेवारीपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सोमवारी येथे दिले.
अकोला : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा सर्व शासकीय आरोग्य संस्थांचे इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल व फायर ऑडिट १८ जानेवारीपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सोमवारी येथे दिले.
जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, विद्युत विभागाचे शाखा अभियंता राठोड, न.पा. प्रशासन अधिकारी सुप्रिया तोलारे, मनपाचे अग्निशमन अधिकारी मनीष कतले तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी आरोग्य संस्थांचा आढावा घेतला. शासकीय आरोग्य संस्थेचे इलेक्ट्रिक ऑडिट करण्यासाठी व स्ट्रक्चरल ऑडिट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थापत्य व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी येत्या १८ जानेवारीपर्यंत पूर्ण करून अहवाल सादर करावे. याच संस्थांचे फायर ऑडिट करण्यासाठी महाराष्ट्र अग्निशमन सेवा विभागाने अधिसूचित संस्थांकडून विहित प्रक्रियेचा अवलंब करून पूर्ण करावे, असे निर्देश पापळकर यांनी दिले.